भुसावळातील महिला पर्यावरण मंचचा सलग पाचव्या वर्षीही स्तुत्य उपक्रम:

चिमणी पाखरांसाठी१०३ ठिकाणी घरटी ठेवून केली दाणापाण्याची सोय

भुसावळ (प्रतिनिधी )

शहरातील वाढत्या तापमानामुळे जिवाची लाहीलाही होते. या वातावरणात पक्ष्यांची अन्न-पाण्यासाठी होणारी तगमग ओळखून महिला पर्यावरण मंचने माणुसकीचे दर्शन घडवले, जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून मंचच्या सख्यांनी गोविंद कॉलनी परिसरातील श्री बटुकेश्वर महादेव मंदिर परिसरात चिमण्यांसाठी दाणा-पाण्याची व्यवस्था केली. त्यासाठी टाकाऊ प्लास्टिक डब्यांचा वापर करून पक्ष्यांसाठी घरटी बनवली. १०३ ठिकाणी ही घरटी बसवली.

महिला पर्यावरण मंचने सलग पाचव्या वर्षी हा उपक्रम राबवला. बुधवारी सकाळी कमल गणपती हॉल परिसरात मंचाच्या सदस्या एकत्र आल्या. त्यांनी झाडांना १० जलपात्र बांधले. प्लास्टिकच्या रिकाम्या डब्यांपासून तयार केलेली अन्नपात्रे लावून त्यात ज्वारी, बाजरी, मूगडाळ आणि तांदूळ अशा धान्याची सोय केली.

यावेळी उपस्थित महिलांना घरी वापरण्यासाठी २० पसरट मातीची भांडी (परळ) वाटण्यात आली, जेणेकरून त्यांच्या घराची बाल्कनी किंवा अंगणात येणाऱ्या पाखरांची तहान भागेल या उपक्रमासाठी मंचाच्या सदस्या मंजू सुरळकर, वैशाली सैतवाल, कल्पना माळी यांचे सहकार्य लाभले. जयश्री इंगळे, माधुरी चौधरी, शुभांगी चौधरी, प्रतिभा गायकवाड, इंद्रायणी सपकाळे या १५ सख्यांनी मेहनत घेतली.

चिमण्यांचा चिवचिवाट पुन्हा वाढल्याने आनंद

वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या घटत आहे. पण, गेल्या काही वर्षांतील सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आता त्यांचा चिवचिवाट पुन्हा कानी पडताना दिसतो. भुसावळकरांनी आपल्या घराच्या परिसरात, शाळांमध्ये किंवा मंदिराच्या आवारात पक्ष्यांसाठी किमान एक पाण्याचे भांडे ठेवावे. तेथे दाणापाणी टाकावे असे आवाहन शालिनी वाडेकर, अध्यक्षा, पर्यावरण सखी मंच यांनी केले

टाकाऊतून टिकाऊ, पुठ्ठांपासून घरटी बनवली

केवळ अन्न-पाणीच नाही, तर पक्ष्यांना सुरक्षित निवारा मिळावा यासाठी मंचच्या सदस्यांनी पुठ्ठांपासून पर्यावरणपूरक घरटी तयार केली होती. ही घरटी सुरक्षित ठिकाणी लावण्यात आली आहेत. या उपक्रमामुळे परिसरात पक्ष्यांचा वावर वाढल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मंडळाने याआधी सुद्धा विविध पर्यावरणपूरक उपक्रम, राबवण्यासाठी पुढाकार घेतला. नागरिकांनी त्यासाठी पुढे यावे असेही आवाहन केले.