महाराष्ट्र शासनाच्या वतीने भव्य आणि आगळावेगळया कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई (प्रतिनिधी ) : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची झलक आकाशात अनुभवण्याची अनोखी संधी मुंबईकरांना मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दिनांक २६ आणि २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता आझाद मैदान येथे भव्य ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष कार्यक्रमात तब्बल २००० ड्रोनच्या साहाय्याने आकाशात महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे देखणे चित्र उभे राहणार आहे. हा महाराष्ट्रातील पहिलाच इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारा ड्रोन शो असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून सोबतच ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही अनुभवता येणार आहे. ‘शिवकल्याण राजा’ या विशेष सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढणार आहे.
हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी सर्व मुंबईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


