जळगाव (प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने मोठी धडक कारवाई करत सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ तारखेला दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास ओझर गावाजवळ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला. संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित गुटखा व तंबाखू आढळून आला.
या कारवाईत एकूण ३७ लाख ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात सुमारे ९६ गोण्या ‘विमल’सह इतर सुगंधित तंबाखूचा समावेश आहे. तसेच अंदाजे १२ लाख रुपये किंमतीचे वाहनही जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी शेहजाद अहमद याकूब मोहम्मद (रा. नवसारी, गुजरात) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पुढील चौकशी सुरू आहे.
ही कारवाई चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पीएसआय संदीप घुले यांच्या नेतृत्वाखालील पथकातील योगेश मांडोळे, विकास पाटील, दत्तू सावळे, ज्ञानेश्वर पाटोळे आणि विलास पवार यांनी ही मोहीम यशस्वी केली.
तसेच अन्न व औषध प्रशासन जळगाव येथील अन्न सुरक्षा अधिकारी आकाश बोराडे, किशोर साळुंखे आणि वाहन चालक वृषभ चव्हाण यांनीही या कारवाईत सहभाग घेतला.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय संदीप घुले करीत असून, या कारवाईमुळे बेकायदेशीर तंबाखू विक्रीवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


