भुसावळ विभागातील ४ तिकीट तपासनीस ‘करोडपती’ — मध्य रेल्वेची उल्लेखनीय कामगिरी :

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने महसूल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून, वित्त वर्ष 2025–26 मध्ये चार तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी तिकीट तपासणीद्वारे ₹१ कोटींपेक्षा अधिक महसूल जमा करत ‘करोडपती’ होण्याचा मान मिळवला आहे.

दक्ष, काटेकोर आणि सातत्यपूर्ण तिकीट तपासणीमुळे या कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या उत्पन्नात मोठी भर घालत महसूल गळती रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

‘करोडपती’ ठरलेले भुसावळ विभागातील कर्मचारी पुढीलप्रमाणे :

  • निसार खान — ₹1.47 कोटी
  • एस. के. गुप्ता — ₹1.16 कोटी
  • के. के. पटेल — ₹1.02 कोटी
  • डी. एन. चौधरी — ₹1.00 कोटी

या चारही कर्मचाऱ्यांनी चालू आर्थिक वर्षात ₹१ कोटींचा टप्पा ओलांडत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे आणखी पाच कर्मचारी सध्या ₹१ कोटींच्या उंबरठ्यावर असून, तेही लवकरच या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे.

या यशामुळे तिकीट तपासणी विभागाची प्रतिष्ठा उंचावली असून, इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. त्यांच्या कार्यामुळे रेल्वे महसुलाचे मोठे नुकसान टळले असून प्रवासी सेवेतही सुधारणा झाली आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेकडून प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे की, अधिकृत विक्रेते, रेल्वे स्थानकावरील बुकिंग खिडक्या, एटीव्हीएम किंवा IRCTCच्या संकेतस्थळाद्वारेच वैध तिकिटे खरेदी करावीत. तसेच प्रवाशांनी Rail One ॲपचा वापर करून तिकिटे आरक्षित करावीत.

विनातिकिट प्रवासाबाबत ‘शून्य-सहिष्णुता’ धोरण कायम ठेवत प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व सन्मानजनक प्रवासाचा अनुभव देण्यास रेल्वे प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.