मुक्ताईनगर येथे ‘अस्मिता खेलो इंडिया’ महिला सायकलिंग लीग २२ मार्च रोजी

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : महिलांमध्ये क्रीडाप्रती आवड निर्माण व्हावी आणि नवोदित खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी या उद्देशाने ‘अस्मिता खेलो इंडिया’ महिला सायकलिंग लीगचे जिल्हास्तरीय आयोजन २२ मार्च २०२६ रोजी मुक्ताईनगर येथे करण्यात आले आहे.

ही स्पर्धा खेलो इंडिया उपक्रमांतर्गत होत असून, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया , सायकलींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तसेच जळगाव जिल्हा सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धा तीन गटांमध्ये होणार आहे:

  • १९ वर्षे व त्यावरील (ओपन गट)
  • १५ ते १८ वर्षे वयोगट
  • १० ते १४ वर्षे वयोगट

जिल्ह्यातील नामांकित महिला सायकलपटू या स्पर्धेत सहभागी होणार असून, प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर महिलांसाठी सायकलिंग स्पर्धा होत असल्याने खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या उपक्रमामागे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांची संकल्पना असून, महिलांचा क्रीडाक्षेत्रातील सहभाग वाढवणे हा मुख्य उद्देश आहे.

स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ९ वाजता रक्षा खडसे यांच्या हस्ते होणार असून विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विजेत्या खेळाडूंना पदक, प्रमाणपत्र तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे.

स्पर्धेसाठी वैद्यकीय सुविधा, नाश्ता व इतर सोयींची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. जास्तीत जास्त महिला खेळाडूंनी नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

जिल्ह्यातील नागरिक व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिला सायकलपटूंना प्रोत्साहन द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.