भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यवसायिकांवर मोठे संकट ओढवले आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे कारण देत काही वितरकांकडून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली आहे.

हॉटेल व्यवसायात दररोज नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅस सिलेंडरची आवश्यकता असते. मात्र सध्या सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेल चालक अडचणीत सापडले आहेत. गॅस उपलब्ध न झाल्यास हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते, अशी भीतीही व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.
पर्यायी उपाय म्हणून काही हॉटेल चालक लाकडी कोळशाचा वापर करण्याचा विचार करत आहेत. मात्र हा पर्याय खर्चिक आणि वेळखाऊ असल्याने त्यातूनही अडचणी निर्माण होत असल्याचे हॉटेल चालकांचे म्हणणे आहे.
या परिस्थितीमुळे शहरातील हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम होत असून गॅस पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे. अन्यथा येत्या काही दिवसांत अनेक हॉटेल बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


