जिल्हापेठ पोलिसांची मोठी कारवाई; ८ गावठी पिस्टल जप्त, तस्करी करणाऱ्या टोळीला अटक

जळगाव (प्रतिनिधी ) – जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध अग्निशस्त्रांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ८ गावठी पिस्टल आणि १० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणात शस्त्रांची खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीतील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार काही जण गावठी पिस्टल बाळगून त्यांची विक्री करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नडवाने आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निरीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या पथकाने १ ते २ मार्च दरम्यान ही कारवाई केली.

कारवाईदरम्यान पोलिसांनी यश रामदास नन्नवरे याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून एक गावठी पिस्टल जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने ही पिस्टल केशव सुनिल भालेराव याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. पुढील तपासात भालेरावसह गौरव देविदास साळवे आणि समाधान बळीराम निकम यांना अटक करण्यात आली. या आरोपींकडून आणखी गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

तपासात समाधान निकम हा मध्यप्रदेशातून गावठी पिस्टल आणून जळगाव जिल्ह्यात विक्री करत असल्याचे उघड झाले. त्याच्या माध्यमातून विविध व्यक्तींना पिस्टल पुरविल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

या कारवाईत पोलिसांनी एकूण ८ गावठी पिस्टल, १० जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेल्या काही आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जिल्ह्यात अवैध शस्त्रांच्या पुरवठ्यावर आळा घालण्यासाठी अशा कारवाया सुरूच राहतील, असे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास जिल्हापेठ पोलीस करत आहेत.