वरणगाव येथे ‘महाराजस्व’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७८० नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ

भुसावळ (प्रतिनिधी ) : राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत भुसावळ तालुक्यातील वरणगाव महसूल मंडळ (टहाकळी) येथे आयोजित भव्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी झालेल्या या शिबिरात सुमारे ७८० लाभार्थ्यांनी महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी तहसीलदार नीता लबडे होत्या. यावेळी नायब तहसीलदार संतोष विनंते, पूजा अवघडे, शोभा घुले, हेमंत गुरव, जितेंद्र पाडवी, रोशना रेवतकर तसेच कृषी, भूमी अभिलेख आणि महिला व बालविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री सावकारे यांनी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पाणंद रस्ते मोकळे ठेवण्याचे आवाहन केले. ‘बळीराजा पानंद रस्ते मोहिमे’अंतर्गत पाणंद रस्त्यांचे खडीकरण करून ते सुस्थितीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिबिरात महसूल विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नायब तहसीलदार संतोष विनंते यांनी अकृषिक (एनए) कायद्यातील बदलांची माहिती दिली. तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजनेबाबत माहिती देत दिव्यांग नागरिकांनी यूडीआयडी कार्ड काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले.

सेतू सुविधा केंद्रामार्फत आधार अपडेट, उत्पन्न व इतर दाखल्यांसाठी अर्ज भरणे आदी सेवा शिबिरातच उपलब्ध करून देण्यात आल्या. याशिवाय अचूक ७/१२ वाटप, फेरफार निर्गती, सातबारा दुरुस्ती, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, शालेय दाखले तसेच इतर योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला.

या शिबिरामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या विविध कामांचा जागेवरच निपटारा झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती लुटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंगेश पारिसे यांनी केले.