सावदा, (प्रतिनिधी) – दि. २ मार्च २०२६ : वडताल धाम अंतर्गत सावदा येथील पुरातन श्री स्वामिनारायण मंदिरात पौर्णिमेनिमित्त विशेष दर्शन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर ३ मार्चऐवजी हा सोहळा २ मार्च रोजीच आयोजित करण्यात आला होता.

पौर्णिमेनिमित्त सकाळपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आरती, भजन-कीर्तन व विशेष दर्शनासाठी सावदा शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. दिवसभर मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता.
यंदाच्या पौर्णिमा दर्शन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे होळी सणानिमित्त करण्यात आलेली आगळीवेगळी सजावट. मंदिरातील श्री हरिकृष्ण महाराज व राधाकृष्ण देव यांच्या मूर्तींना साखरेपासून तयार केलेल्या होळीच्या साजाने तसेच आकर्षक पिचकारी सजावटीने अलंकृत करण्यात आले होते. ही देखणी सजावट मंदिराचे पुजारी सत्यप्रकाश दासजी यांनी भावपूर्ण सेवाभावाने साकारली. या अनोख्या आरासेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, ४ मार्च २०२६ रोजी नरनारायण देव जयंतीनिमित्त मंदिरात पारंपरिक पद्धतीने “फुल दोलोत्सव” साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सुगंधी फुलांची आरास, विशेष सजावट, भजन-कीर्तन व महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून भक्तिमय वातावरणात भगवान नरनारायण देवांना विविधरंगी फुलांनी सजवून दोलोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराचे कोठारी स्वयंप्रकाश दासजी, धर्म किशोर दासजी, पुजारी सत्यप्रकाश दासजी तसेच व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्व पुरुष व महिला हरिभक्तांना करण्यात आले आहे.


