नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनीषा पाटील यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2026’ प्रदान


भुसावळ (प्रतिनिधी ) — नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनीषा पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व पर्यावरणीय कार्याबद्दल ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2026’ या राज्यस्तरीय सन्मानाने गौरविण्यात आले.

स्वर्गीय आबासाहेब रघुनाथ आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. निसर्ग मित्र समिती (जळगाव) आणि सार्वजनिक सेवा मंडळ (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले.

मनीषा पाटील यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताना वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, ‘पाणी अडवा–पाणी जिरवा’ उपक्रम, पशुपक्ष्यांची जोपासना, प्रदूषणमुक्त दिवाळी अभियान तसेच पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांच्या वापराचा प्रसार अशा विविध उपक्रमांद्वारे समाजात पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण केली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या कार्यामुळे इतरांनाही सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रमांसाठी प्रेरणा मिळत आहे.