नागपूर – नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात आज सकाळी घडलेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला. राऊळगाव येथे असलेल्या SBL Company या स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपनीत सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास प्रचंड स्फोट झाला. बारूद, डेटोनेटर आणि इतर स्फोटके तयार करणाऱ्या युनिटमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

स्फोट इतका तीव्र होता की आसपासच्या परिसरात मोठा आवाज घुमला आणि काही क्षणांतच धुराचे प्रचंड लोट आकाशात झेपावले. घटनास्थळी काम करत असलेल्या कामगारांपैकी 15 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर 18 हून अधिक कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्फोटानंतर कंपनी परिसरात आग लागल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दल आणि आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर Wa यानियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांचा शोध सुरू आहे.
काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देत कंपनी प्रशासनावर सुरक्षेबाबत गंभीर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. योग्य प्रशिक्षणाशिवाय आणि आवश्यक सुरक्षाव्यवस्था न ठेवता कामगारांकडून काम करून घेतले जात असल्याचा दावा त्यांनी केला. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार स्फोटक साहित्य हाताळताना तांत्रिक बिघाड किंवा निष्काळजीपणा कारणीभूत असू शकतो. मात्र अधिकृत चौकशी अहवालानंतरच खरी कारणमीमांसा समोर येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना अफवा पसरवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.



