भुसावळ : प्रांताधिकाऱ्यांकडून महाशिवपुराण कथास्थळाची पाहणी; सुरक्षेला प्राधान्य

भुसावळ(प्रतिनिधी ) – पाडळसे (ता. यावल) येथील अकलूद शिवारात १० ते १६ मार्चदरम्यान होणाऱ्या महाशिवपुराण कथेनिमित्त प्रशासन सतर्क झाले आहे. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर फैजपूरचे प्रांताधिकारी बबन काकडे यांनी कथास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून विविध व्यवस्थांचा आढावा घेतला. तसेच दोन दिवसांपूर्वी अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर यांनीही नियोजनाबाबत बैठक घेतली असून लवकरच जिल्हाधिकारी स्वतः स्थळाला भेट देणार आहेत.

प्रांताधिकारी काकडे यांनी कथा मंडपाची उपलब्ध जागा, भाविकांसाठी बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, अन्नछत्र व्यवस्था, वीजपुरवठा आणि वाहनतळ याबाबत सविस्तर माहिती घेतली. मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधित विभागांना विशेष सूचना देण्यात आल्या.

या कथेसाठी पंडित प्रदीप मिश्रा यांचे प्रवचन होणार असून मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला आपत्कालीन वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्याचे, स्वच्छता विभागाला परिसर निर्जंतुक व स्वच्छ ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिस प्रशासन, आरटीओ व सार्वजनिक बांधकाम विभागाला गर्दी नियंत्रण व सुरक्षा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पाणीपुरवठा विभागाला शुद्ध पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यास सांगितले आहे.

“भाविकांच्या सुरक्षेला आमचे पहिले प्राधान्य आहे. प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून कामाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. ते लवकरच अंतिम तयारीची पाहणी करतील,” अशी माहिती प्रांताधिकारी बबन काकडे यांनी दिली.