नववर्षाचे स्वागत धुंदीत नव्हे तर शुद्धीत करू या : भुसावळात नशाबंदी मंडळाचा स्तुत्य उपक्रम

भुसावळ, (प्रतिनिधी ) – नववर्षाचे स्वागत धुंदीत नव्हे तर शुद्धीत करू या, या संदेशासह नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भुसावळ येथे जनप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आला. जळगाव जिल्हा टाटा मॅजिक टॅक्सी परवानाधारक चालक-मालक संघटना व दिशा सोशल फाउंडेशन यांच्या सहकार्याने हा उपक्रम गेल्या 15 वर्षांपासून सातत्याने राबविला जात आहे.

बुधवार, 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पांडुरंग टॉकीज चौकात टाटा मॅजिक वाहनावर प्रबोधनात्मक बॅनर लावून अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांचे संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, सचिव चंद्रकांत चौधरी, कार्याध्यक्ष दिनेश भंगाळे व उपाध्यक्ष धनराज सोनवणे यांनी स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, टॅक्सी चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. येणाऱ्या नवीन वर्षात दारू किंवा कोणतेही व्यसन करणार नाही, असा संकल्प उपस्थितांनी केला व सर्वांनी मिळून प्रतिज्ञा घेत व्यसनमुक्तीचा संदेश दिला. कार्यक्रमात केदार बारबोले यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या तसेच शहरवासीयांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले. संघटनेतर्फे दिनेश भंगाळे यांनीही प्रबोधनात्मक मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत चौधरी यांनी केले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनराज सोनवणे, लक्ष्मण चौधरी, प्रकाश कोळी, चंदू पाटील, लक्ष्मण भोळे, कपिल चौधरी, जगदीश खैराडे, प्रदीप चौधरी, संतोष भोई, गजानन हेंडे, दीपक सोनवणे, बबलू सुतार, जयराज सोनवणे, अनिल चौधरी तसेच कॉन्स्टेबल संकेत झांबरे आदींनी परिश्रम घेतले.