अडावद (प्रतिनिधी )- अडावद पोलीस स्टेशनच्या हद्दीतून विविध कारणांमुळे बेपत्ता झालेल्या, हरवलेल्या तसेच अपहृत मुली, बालके, महिला व पुरुषांचा शोध घेण्यासाठी अडावद पोलिसांनी विशेष शोध मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत गेल्या तीन महिन्यांत पोलिसांनी तब्बल २० व्यक्तींचा शोध घेण्यात यश मिळविले असून, त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी अडावद पोलिसांनी कसून तपास, गोपनीय माहितीचे संकलन तसेच आधुनिक तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला. विविध प्रकरणांमध्ये उपलब्ध माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवून बेपत्ता व्यक्तींचा ठावठिकाणा शोधण्यात आला. या मोहिमेमुळे आपल्या कुटुंबीयांपासून दूर गेलेल्या व्यक्ती पुन्हा कुटुंबात परतल्याने संबंधित कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. बेपत्ता व अपहृत व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अडावद पोलिसांच्या कामगिरीची चर्चा होत आहे. बेपत्ता व्यक्तींच्या प्रकरणांचा गांभीर्याने तपास करून त्यांचा शोध घेण्याच्या दृष्टीने अडावद पोलिसांनी राबविलेली ही विशेष मोहीम महत्त्वपूर्ण ठरली आहे.


