भुसावळ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव यांच्या वतीने २० डिसेंबर रोजी शिक्षक व अधिकारी-कर्मचारी यांची विभागीय योगासन स्पर्धा नंदुरबार येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जळगाव, धुळे, नाशिक व नंदुरबार या चारही जिल्ह्यांतील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

४६ ते ५८ वयोगटात एकूण ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या गटात श्रीमती ज्योती मुरलीधर वानखेडे (जि. प. शाळा, वांजोळा, ता. भुसावळ, जि. जळगाव) यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशामुळे भुसावळ तालुका व जळगाव जिल्ह्याचे नाव उज्वल झाले आहे.
या विजयासह श्रीमती वानखेडे यांनी येणाऱ्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भुसावळ शिक्षण विभाग, केंद्रप्रमुख, सहकारी शिक्षक तसेच गावकरी यांच्याकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
योगसाधनेतील सातत्य, शिस्त आणि मेहनतीचे हे यशस्वी फलित असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



