मध्य रेल्वेत १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान ‘डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम-५.०’!

रेल्वे पेन्शनधारकांसाठी ५० ठिकाणी सुविधा; ८० वर्षांवरील ज्येष्ठांना विशेष मदत आणि आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन

मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार, मध्य रेल्वेतर्फे १ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (डीएलसी) मोहीम-५.०’ अर्थात डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम राबविण्यात येणार आहे. रेल्वे पेन्शनधारक आणि कुटुंब पेन्शनधारकांना वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करणे अधिक सोयीस्कर, सुलभ आणि त्रासमुक्त व्हावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

ही मोहीम मध्य रेल्वेची मुख्यालये, विभागीय कार्यालये आणि कार्यशाळांमध्ये राबविण्यात येणार असून, पेन्शनधारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करता यावे, यासाठी मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात सुमारे ५० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या सुविधेमुळे पेन्शनधारकांना वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

पेन्शनधारकांना प्रमाणपत्रासाठी मदत

या मोहिमेदरम्यान पेन्शन देणाऱ्या बँका, पेन्शनधारक संघटना आणि संबंधित अधिकारी यांच्या समन्वयातून जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच, डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्यासाठी पेन्शनधारकांना आवश्यक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल.

८० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी विशेष सुविधा

वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या किंवा त्याहून अधिक वयाच्या अतिज्येष्ठ पेन्शनधारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी येऊ नयेत, यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय, या मोहिमेअंतर्गत पेन्शनधारकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन

सर्व रेल्वे पेन्शनधारक आणि कुटुंब पेन्शनधारकांनी या मोहिमेत सहभागी होऊन डिजिटल जीवन प्रमाणपत्र वेळेत सादर करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. या उपक्रमामुळे डिजिटल पेन्शन सेवांचा वापर वाढण्यास आणि पेन्शनधारकांना अधिक सुलभ सेवा मिळण्यास मदत होणार आहे.