भुसावळ (प्रतिनिधी ) – जळगाव रनर्स ग्रुप तर्फे आयोजित खान्देश रनच्या ९ व्या पर्वात भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या धावपटू सायली बेंडाळे या महिलांच्या १० किमी स्पर्धेत द्वितीय ठरल्या तर युवराज सूर्यवंशी पुरुष गटात १० किमी स्पर्धेत द्वितीय ठरले. याशिवाय १० वर्षाच्या माहिन्म गणसिंग पाटील याने देखील ३ किमी स्पर्धेत प्रथम येऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
२१ किमी, १० किमी, ५ किमी व ३ किमी या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या तब्बल ३१ धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला. याबद्दल असोसिएशनचे प्रमुख प्रा.प्रविण फालक यांनी सर्व धावपटूंचे कौतुक केले व आनंद व्यक्त केला.
स्पर्धेची सुरुवात कडाक्याच्या थंडीत पहाटे ५.३० वाजता जळगाव येथील सागर पार्क मैदानापासून झाली. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, किरण बच्छाव, विक्रांत सराफ, डॉ विवेक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मैदानापासून डी मार्टच्या रस्त्याने पुढे जाऊन लांडोरखोरी व तेथून परत येऊन महाबळ रस्त्याने गाडगेबाबा चौक व मैदानावर परत असा १० किमी स्पर्धेचा मार्ग होता. २१ किमीच्या स्पर्धकांसाठी सदरील अंतर दोनदा धावायचे होते.
जळगाव रनर्स ग्रुपच्या स्वयंसेवकांनी धावपटूंसाठी ठिकठिकाणी केलेली पेयजल,बिस्कीट,केळी आदी व्यवस्था, पोलिसांचे कडक वाहतूक नियमन, काही ठिकाणी जळगावकर नागरिकांनी टाळ्या वाजवून केलेले धावपटूंचे स्वागत व पुष्पवर्षाव, मार्गावर बँड व डीजेचा जोश, आयोजकांनी मैदानावर केलेली उत्कृष्ठ व्यवस्था, धाव संपल्यानंतर मैदानावर परतल्यावर मिळणारा स्वादिष्ट नाश्ता व प्रत्येक धावपटूस जीव कि प्राण असलेले पदक यासोबतच झुम्बाचे संगीत या सर्व व्यवस्थेमुळे हि मॅरेथॉन स:स्मरणीय झाल्याची भावना भुसावळच्या धावपटूंननी बोलून दाखविली.
सहभागी धावपटू पुढीलप्रमाणे:
२१ किमी: जितेंद्र चौधरी, मंगेश चंदन, मधुकर इंगळे, राजेंद्र घाटे, सारंग चौधरी, प्रदीप सोलंकी, गणसिंग पाटील, प्रविण वारके,प्रविण पाटील.
१० किमी: रेवती मांडे, पुष्पा तिवारी, जयश्री तिकोटकर, सुनिता सिंग,सरला पाटील, सायली बेंडाळे, महेंद्र पाटील, संजय तिवारी, राजीवकुमार यादव,प्रशांत चौधरी, रमेशसिंग पाटील, सुयश न्याती, युवराज सूर्यवंशी, सुनील सोनगिरे.
५ किमी: महेंद्र मांडे
३ किमी: माहिन्म गणसिंग पाटील, सुधीर बेंडाळे.
दर रविवार, मंगळवार व गुरुवारी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे धावपटू एकत्रित धावण्याचा सराव करीत असतात व देशातील विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये शहराचे नाव उंचावत असतात. यापूर्वी विशाखापट्टणम येथे संपन्न झालेल्या विझाग नेव्ही मॅरेथॉन मध्ये किर्ती मोतळकर, संजय मोतळकर, ममता ठाकूर, राजेंद्र ठाकूर व सोनाली पाटील यांनी यशस्वी सहभाग नोंदविला होता.
सर्व धावपटूंचे शहरातील क्रीडाप्रेमी नागरिकांनी ठिकठिकाणी सत्कार करून कौतुक केले.



