जळगावात महायुतीत राष्ट्रवादीची सहा जागांवर बाेळवण, महानगर जिल्हाध्यक्ष यांचा राजीनामा : जळगाव महापालिका निवडणूक : दिवसभर नेत्यांच्या बैठका आणि नाट्यमय घडामोडी :

भुसावळ प्रतिनिधी/जळगाव महापालिका निवडणूक रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपली. मात्र, तरीही भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीची घाेषणा हाेऊ शकली नाही. नेत्यांनी ठरवलेल्या फाॅर्म्यूल्यानुसार थेट एबी फाॅर्म जाेडून अर्ज भरण्यात आले आहेत. बंडखाेरी हाेऊ नये म्हणून एकाही पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर करण्याची हिंमत दाखवली नाही. दिवसभर नाट्यमय घडामाेडी महायुतीच्या गाेटात घडल्या. दरम्यान, जागा वाटपाचे तर साेडाच पण आपलेच तिकिट कापले गेल्याची कुणकुण लागतात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला.

उमेदवारी नेत्यांच्या घरात, कार्यकर्ते संतप्त

भाजप, शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्यांनी आपल्या कुटुंबात दाेन-दाेन जणांना तिकिटे दिली आहेत. त्यामुळे नाराजी उफाळून आली आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी शेकडाे इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपने या वेळी अनेक दिग्गजांची उमेदवारी कापून नवख्यांना संधी दिली आहे. मात्र, त्यात सर्वसामान्य कार्यकर्ते कमी असून पदाधिकाऱ्यांचे निकटवर्तीयच जास्त आहेत. स्थायी समितीचे माजी सभापती जितेंद्र मराठे यांची उमेदवारी कापण्यात आली आहे. त्यामुळे संघ परिवारात प्रचंड नाराजीचा सूर उमटताे आहे. राष्ट्रवादीला जागा साेडण्यासाठी मराठेंचा बळी दिला गेला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

आमदार भाेळेंच्या घरात तीन तिकिटे

भाजपचे आमदार सुरेश भाेळे यांच्या घरात तीन तिकिटे दिली गेली. त्यात शालक विरेन खडके, मुलगा विशाल भाेळे, पत्नी सीमा भाेळे यांचा समावेश आहे. पहूर येथील रहिवासी व अलिकडेच जळगावात राहण्यासाठी आलेले अरविंद देशमुख यांनाही उमेदवारी दिली आहे. मात्र, वर्षानुवर्षे पक्षाच्या सतरंज्या उचलणारे व झेंडा घेऊन मिरवणाऱ्यांना उमेदवारी न मिळाल्याने असंताेष खदखदत आहे. माघारीपर्यंत त्या भावनांचा उद्रेक हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख संताेष पाटील यांचीही उमेदवारी कापली गेल्याने वातावरण तापले हाेते. त्यांनी साेमवारी आमदार किशाेर पाटील यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शनात अर्ज भरला हाेता.