भुसावळ (प्रतिनिधी)

भुसावळ नगरपालिकेच्या चुरशीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांना मोठा धक्का बसला असून नगरसेवक पदाच्या 240 उमेदवारांपैकी तब्बल 131 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या पराभूत उमेदवार रजनी सावकारे यांची अनामत वाचली असली, तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), बहुजन समाज पार्टी व तीन अपक्ष उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे.
नगराध्यक्षपदासाठी एकूण आठ उमेदवार रिंगणात होते. यापैकी भाजपच्या रजनी सावकारे यांना आवश्यक किमान मतसंख्या मिळाल्याने त्यांची अनामत वाचली. उर्वरित उमेदवारांना 12 हजार 261 पेक्षा कमी मते मिळाल्याने त्यांची अनामत जप्त करण्यात आली. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आर्शिया अन्सारी, बहुजन समाज पार्टीच्या किर्ती वानखेडे, राष्ट्रीय काँग्रेसच्या सविता सुरवाडे तसेच अपक्ष उमेदवार ज्योती समशेर, अलका सुरवाडे व पुष्पा सोनवणे यांचा समावेश आहे.
प्रभाग 14 मध्ये सर्वाधिक 14 अनामती जप्त
शहरातील मुस्लिमबहुल प्रभाग क्रमांक 14 मध्ये सर्वाधिक उमेदवारांच्या अनामती जप्त झाल्या. अ जागेसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले, तर उर्वरित सात उमेदवारांची अनामत जप्त झाली. ब जागेसाठी दहा उमेदवारांपैकी एका अपक्षाची अनामत वाचली असून उर्वरित आठ उमेदवारांच्या अनामती जप्त झाल्या. या प्रभागात एकूण 14 उमेदवारांच्या अनामती जप्त झाल्या आहेत.
मोठ्या फरकाने पराभव, तरी अनामत वाचली
प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजप व राष्ट्रवादी शरद पवार गटात लढत झाली. भाजपच्या उमेदवाराला 1,443 मते मिळून विजय मिळाला. एकूण 1,809 वैध मतांपैकी 1/7 म्हणजे 226 पेक्षा कमी मते मिळाल्यास अनामत जप्त होणार होती. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराला 322 मते मिळाल्याने मोठ्या फरकाने पराभव होऊनही त्यांची अनामत वाचली.
विविध पक्षांच्या उमेदवारांच्या अनामती जप्त
भाजप : प्रभाग 3 अ, 3 ब, 12 अ-ब, 16 अ-ब, 17 ब, 18 अ-ब, 19 अ-ब
राष्ट्रवादी शरद पवार गट : प्रभाग 3 ब, 4 ब, 7 ब, 8 अ-ब, 10 ब, 11 अ, 20 ब, 22 अ
राष्ट्रीय काँग्रेस : प्रभाग 2 अ, 6 अ, 8 ब, 10 अ, 12 ब, 14 ब, 15 अ-ब, 16 अ-ब, 17 अ-ब, 19 ब, 20 ब
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : प्रभाग 6 अ-ब, 8 अ-ब, 11 अ-ब, 13 अ, 15 अ, 20 अ, 21 अ
महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966 च्या नियम 14(4) नुसार, पराभूत उमेदवारास एकूण वैध मतांच्या 1/8 पेक्षा कमी मते मिळाल्यास त्याची अनामत रक्कम जप्त केली जाते. या नियमानुसार संबंधित उमेदवारांच्या अनामती शासनाकडून जप्त करण्यात आल्या आहेत.


