भुसावळ (उज्वला बागुल ) –
जळगाव महापालिका निवडणूक रणधुमाळी जाेरात सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार शेवटचा दिवस आहे. तत्पूर्वी साेमवारी तब्बल २५० उमेदवारांनी अर्ज दाखल केला. त्यात माजी महापाैर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे यांच्यासह २४ माजी नगरसेवक आणि शिवसेना शिंदे गटाचे चाेपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत साेनवणे यांची मुलगी डाॅ. अमृता साेनवणे व मुलगा डाॅ. गाैरव साेनवणे यांचाही समावेश आहे. याचाच अर्थ नगरपालिका, नगरपंचायतींच्या पाठाेपाठ आता महापालिकेतही घराणेशाहीचा वरचष्मा असल्याचे हेे द्याेतक मानावे लागेल.

महायुतीचे भिजत घाेंगडे
शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी अजित पवार गट अशी महायुती महापालिकेत हाेईल असे चित्र सुरुवातीला निर्माण झाले हाेते. मात्र, गेल्या चार दिवसांत आठ बैठका हाेऊनही त्याच्यावर शिक्कामाेर्तब हाेऊ शकलेले नाही. साेमवारी रात्री एक वाजेपर्यंतच्या मिळालेल्या माहितीनुसार भाजप ४५, शिवसेना शिंदे गट २४ आणि राष्ट्रवादी अजित पवार गट ६ जागा लढणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या संदर्भात अधिकृत घाेषणा मंगळवारी दुपारी हाेण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे मंत्री गिरीष महाजन, राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांच्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. दरम्यान, ऐनवेळी घाईगर्दी हाेऊ नये म्हणून तिन्ही पक्षाच्या इच्छुकांनी अर्ज भरून ठेवण्याची भूमिका घेतली आहे. त्याचाच प्रत्येय साेमवारी आला.
बंडखाेरी टाळण्यासाठी एबी फाॅर्म दडवले
भाजपकडे तब्बल ५५० इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. जागा केवळ ७५ आहेत. त्यापैकी महायुती झाली तर ५०पेक्षा कमी जागा त्यांच्या वाट्याला येऊ शकतात. त्यामुळे बंडखाेरीचा धाेका या पक्षाला अधिक आहे. म्हणून ज्यांना शंभर टक्के तिकिट दिले जाणार आहे. त्यांना भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार सुरेश भाेळे व निवडणूक प्रभारी जबाबदारी असलेले आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वतंत्र बाेलावून निराेप दिला असल्याचेही सांगण्यात येते आहे. भापच्या वाट्याला ज्या जागा आल्या आहेत त्यात तीन जागा अशा आहेत की तेथे भाजपचे दिग्गज वर्षानुवर्षे निवडून येताहेत. त्यातील एक जागा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना कुटुंबातील उमेदवारासाठी हवी आहे. त्यामुळे महायुतीची घाेषणा हाेत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, बंडखाेरी हाेऊ नये म्हणून भाजपने एबी फाॅर्म दडवले आहेत असेही समाेर येते आहे.
माजी आमदार चाैधरींमुळे निवडणुकीत रंगत
जळगाव महापालिका निवडणुकीत सुरुवातीला भाजपच्या दिशेने एकतर्फी चित्र निर्माण झाले हाेते. मात्र, भुसावळ पालिकेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार संताेष चाैधरी, माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी या बंधूंनी नगराध्यक्ष पदाच्या लढतीत मंत्री संजय सावकारे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री रक्षा खडसे, मंत्री गुलाबराव पाटील या चाैघांना आस्मान दाखवले. अर्थात, भाजपचा पराभव केला. आणि मविआच्या उमेदवार गायत्री भंगाळे या तेथे निवडून आल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाने जळगाव महापालिका निवडणूक प्रभारी म्हणून आक्रमक नेतृत्व असलेले माजी आमदार संतोष चौधरी यांना जबाबदारी दिली आहे. त्यामुळे निवडणुकीत रंगत आली असल्याचे जाणवते.
मविआचे जागा वाटप यशस्वी
महाविकास आघाडीत सध्या राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट असे एकत्र आहेत. दोघांनी समान जागा घेतल्या आहेत. मनसेला ठाकरे गट आणि इतर समविचारी पक्षांना राष्ट्रवादी शरद पवार गट त्यांच्या कोट्यातून जागा देणार आहे. मंगळवार मविआचे चित्र स्पष्ट होईल.


