आंबेडकरी साहित्याचे गाढे अभ्यासक अरुण सुरवाडे यांचा अजिंठा सोसायटीतर्फे सत्कार

जळगाव (प्रतिनिधी ) -: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करणारे, तसेच सुमारे ८,००० हून अधिक ग्रंथांचे संग्राहक असलेले अरुण सुरवाडे यांचा अजिंठा हाउसिंग सोसायटीतर्फे जेतवन बुद्ध विहार येथे दिनांक २३ डिसेंबर रोजी गौरव करण्यात आला. महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चार ग्रंथांचे मुद्रित शोधन (प्रूफ रीडिंग) त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल हा सत्कार करण्यात आला. यावेळी शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. आनंद कोचुरे होते. मनोगत व्यक्त करताना अरुण सुरवाडे यांनी मुद्रित शोधन हे अत्यंत जिकिरीचे व जबाबदारीचे काम असल्याचे सांगितले. केवळ काना-मात्रा तपासून चालत नाही, तर मूळ संदर्भ काय आहे हेही तपासावे लागते, असे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले. एका शासकीय ग्रंथात जळगाव येथील राजमल लखीचंद जैन यांच्या नावातील ‘एल’ अक्षर टाईप न झाल्याने नाव ‘राजमा’ असे छापले गेले आणि पुढील मराठी अनुवादातही तीच चूक राहिल्याचा प्रसंग त्यांनी नमूद केला.

प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी शासकीय प्रकाशनांना प्रमाण मानले जाते; मात्र शासनातर्फे प्रकाशित अनेक ग्रंथांत चुकीची माहिती आढळते, असे सांगितले. बाबासाहेबांच्या संदर्भातील ग्रंथांत तर अशा चुका अधिक प्रमाणात दिसतात. अशा चुकांची नोंद (जंत्री) अरुण सुरवाडे यांनी तयार केल्याचेही त्यांनी नमूद केले. सर्व वाचक चिकित्सक पद्धतीने वाचन करत नसल्याने काही वेळा चुकीच्या माहितीच्या आधारे मते तयार होतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

यावेळी सुमित्रा अहिरे, सोसायटीचे चेअरमन दिलीप सपकाळे, चंद्रशेखर अहिरराव, ॲड. आनंद कोचुरे व पी. डी. सोनवणे यांनी अरुण सुरवाडे यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रीय शिक्षिका ज्योती भालेराव यांनी केले. प्रास्ताविक हर्षल सुरडकर, आभारप्रदर्शन कविता सपकाळे तर परिचय दिलीप तासखेडकर यांनी करून दिला. प्रारंभी भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्रिसरण व पंचशील ग्रहण करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रवीण नन्नवरे, रामकृष्ण सावळे, विलास भालेराव, सुनंदा वाघ, सुमन बौसाने, विमल भालेराव, वर्षा कोचुरे, पूजा कोचुरे, प्रियंका सपकाळे, गणेश सुरवाडे, अर्चना भालेराव, मनीषा भालेराव, गीता सोनवणे, प्रकाश सोनवणे, खुशाल सोनवणे, देवा निकम, सुनील देहाडे, योगेश सोनवणे आदींसह मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.