भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ नगरपालिका निवडणूक 2025 साठी आज (2 डिसेंबर) सकाळपासून मतदानाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी लोकशाही कर्तव्य बजावण्यासाठी लवकरच मतदान केंद्रांचा रुख केला आहे. शिस्तबद्ध वातावरणात मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत आहे.

महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा आमदार संजय सावकारे यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या आई, धर्मपत्नी तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. रजनी सावकारे यांनीही मतदान करून आपला सहभाग नोंदवला.
मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री सावकारे म्हणाले, “मतदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. प्रत्येक नागरिकाने मतदान करून लोकशाही मजबूत करण्यासाठी आपला हक्क नक्की बजवावा.” असे आवाहन त्यांनी केले.
शहरातील विविध मतदान केंद्रांवर शांत, शिस्तबद्ध व सुरळीत वातावरणात मतदान होत असून मतदारांमध्ये उत्साह जाणवत आहे. नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुसावळकरांनी योग्य नेतृत्व निवडण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहनही मंत्री सावकारे यांनी केले.
नागरिकांचे प्रत्येक मत महत्त्वाचे असून शहराच्या विकासाला गती देण्यासाठी सक्रिय सहभाग आवश्यक आहे, असा संदेश देत त्यांनी सर्व भुसावळकरांना लोकशाही प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन केले.


