राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरींची संयमी भूमिका; भुसावळ पालिका निवडणूक : महाविकास आघाडीचा उमेदवार 15 रोजी जाहीर करण्याची खेळी;

भुसावळ (प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी सांगितले की, भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सहा महिने आधीच ठरला आहे. आम्ही मात्र पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांशी चर्चा करून 15 रोजी उमेदवाराचे नाव जाहीर करू. आमच्याकडे गायत्री रूपचंद भंगाळे, स्वाती कुणाल जंगले, उषा मनोहर तायडे, अ‍ॅड .प्रगती उल्हास पगारे, शोभा रामदास सावकारे इच्छूक अहेत. त्यातील एकाच्या नावावर निश्चिती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी माध्यमातून निवडणूक

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उबाठासह काँग्रेसने आमच्याकडे जागांची मागणी केली असून याबाबतही निवडून येणार्‍या जागांवरच आम्ही वाटाघाटी करणार असून 15 रोजी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी इच्छूक असलेल्यांची नावे आम्ही जाहीर करू. आमच्याकडे कुठलेही कंत्राटदार उमेदवार नाहीत, जे नागरिकांच्यासाठी रस्त्यावर उतरतील, अशांना आम्ही उमेदवारी देवू.

प्रत्येक नेता सोयीनेच बोलतो : दिलीप खोडपे :

आमदार खडसेंचा राजीनामा घेण्यात आल्याची टीका आमदार अनिल पाटील यांनी केल्याच्या वक्तव्यावर जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी सांगितले की, जुन्या गोष्टी उकरून काढण्यात अर्थ नाही. प्रत्येक नेता त्याच्या सोयीनुसार बोलतो. यावेळी वरणगावचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र चौधरी, विशाल नारखेडे, जयेश चौधरी व पदाधिकारी उपस्थित होते.