भुसावळ (प्रतिनिधी) – भारतातील सर्वात कठीण आणि सहनशक्तीची कसोटी मानल्या जाणाऱ्या डेक्कन क्लीफहँगर या अल्ट्रा सायकलिंग स्पर्धेत भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सायकलपटू जगदीश नामदेव रेहपाडे व युवराज सूर्यवंशी यांनी अभिमानास्पद यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत सहभागी सायकलपटूंना ६४३ किलोमीटर अंतर आणि जवळपास ६५०० मीटर उंची पार करायची होती. दोन्ही सायकलपटूंनी हे आव्हान केवळ ३६ तासांच्या आत पूर्ण करून आपली जिद्द, शिस्त आणि चिकाटी सिद्ध केली.
स्पर्धेची सुरुवात पुणे (केशवबाग) येथून पहाटे ५ वाजता झाली. पुणे – सातारा -मेधा घाट -रहिमतपूर -पुसे सवळी -विटा -कराड -मळगाव -मालकापूर -अनुस्कुरा घाट -राजापूर -कुडाळ -गोवा असा स्पर्धेचा मार्ग होता.
संपूर्ण राईडदरम्यान सायकलपटूंना सततचा पाऊस, थंडी, धुकं आणि उष्णतेचा ताण यांचा सामना करावा लागला. मालकापूर घाट आणि अनुस्कुरा घाट येथील चढ-उतार विशेषतः आव्हानात्मक ठरले. तरीही, दोन्ही सायकलपटूंनी मानसिक आणि शारीरिक तग धरण्याची अद्भुत क्षमता दाखवत हा कठीण प्रवास पूर्ण केला.
ही स्पर्धा फक्त सायकल राईड नव्हती, तर ती होती सहनशक्ती, निश्चय आणि आत्मविश्वासाची खरी परीक्षा. भुसावळच्या या जोडीने केवळ शहराचा नव्हे तर संपूर्ण प्रदेशाचा अभिमान वाढवला असून, त्यांनी प्रत्येक सायकलप्रेमीसाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे असे भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.प्रविण फालक यांनी यावेळी सांगितले.



