जळगाव गुन्हे शाखेची कामगिरी :फत्तेपूर येथील चोरीची उकल :चार लाखांच्या दागिण्यांची चोरी करणारा चोरटा जाळ्यात –

जळगाव – सोनं खरेदीच्या बहाण्याने लक्ष विचलीत करीत चार लाखांचे दागिने लांबवण्याची घटना फत्तेपूर पोलीस स्टेशन हद्दीतील देउळगाव गुजरी येथील हरीओम अलंकार या सोन्याच्या दुकानात घडली होती. गुन्हे शाखेने या गुन्ह्याप्रकरणी एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले असून त्याचे मध्यप्रदेशातील दोन साथीदार पसार झाले आहेत.
चेतन नंदकिशोर विसपुते (26, रा.कापडगल्ली, जामनेर) यांनी सोमवार, 4 ऑगस्ट रोजी फत्तेपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यानुसार, दोन अनोळखी इसमांनी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश केला आणि चेतन विसपुते यांचे लक्ष विचलित करून चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले होते. या प्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हे शाखेने या गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका अल्पवयीन मुलाला (विधी संघर्षग्रस्त बालक) निष्पन्न करून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने मध्य प्रदेशातील आपल्या दोन साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला पुढील कारवाईसाठी फत्तेपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले तर पसार साथीदारांचा शोध सुरू आहे. फत्तेपूर
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव), उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र नरवाडे, हवालदार गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, नाईक विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे आणि चालक महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.