पंतप्रधान नरेन्द मोदी यांच्या हस्ते ३ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा ;

पंतप्रधानांनी दि. १०.०८.२०२५ रोजी अजनी (नागपूर)–पुणे वंदे भारत, बेंगळुरू–बेळगावि वंदे भारत आणि कटडा–अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस या ३ वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला

पंतप्रधान नरेन्द मोदी यांच्या हस्ते दि. १०.०८.२०२५ रोजी केएसआर बेंगळुरू रेल्वे स्थानक येथून अजनी (नागपूर)–पुणे वंदे भारत, केएसआर बेंगळुरू–बेळगावि वंदे भारत आणि श्री माता वैष्णो देवी कटडा–अमृतसर वंदे भारत या ३ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या प्रसंगी थावर चंद गहलोत, राज्यपाल, कर्नाटक; सिद्धरामैया, मुख्यमंत्री, कर्नाटक; तसेच अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस, . मुख्यमंत्री, महाराष्ट्र; नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री तसेच इतर मान्यवरांनी नागपूर रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमाला उपस्थित राहून आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमाशी जोडले गेले.

नागपूर (अजनी) – पुणे वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या प्रवासाचा तो खास क्षण टिपण्यासाठी नागपूर स्थानक प्रवाशांच्या उत्साहाने गजबजलेले असून संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते; लोकांनी उत्साहाने छायाचित्रे घेतली आणि विदर्भातून आपला पहिला प्रवास सुरू करणाऱ्या, फुलांनी सजवलेल्या वंदे भारत गाडीचे प्लॅटफॉर्मवरून कौतुक केले.

अजनी (नागपूर) – पुणे वंदे भारत एक्सप्रेसविषयी माहिती:
अजनी (नागपूर) – पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही आतापर्यंतची सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत असून हि ट्रेन ८८१ किमी अंतर पार करेल.

• महाराष्ट्रातील ही १२वी वंदे भारत एक्सप्रेस आहे.
• वर्धा — मनमाडदरम्यान आतापर्यंत न पोहोचलेल्या भागाला सेवा देणारी ही पहिली वंदे भारत आहे.
• नागपूर — पुणे दरम्यानची ही सर्वात वेगवान गाडी असून सरासरी वेग ७३ किमी/तास आहे आणि प्रवासात १० थांबे आहेत.

नागपूर आणि पुणे ही दोन्ही वेगाने विकसित होत असलेली महानगरे असून येथे असंख्य लघु व मध्यम उद्योग, नामांकित शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्था तसेच ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळे आहेत. अजनी (नागपूर) – पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यामुळे या दोन शहरांदरम्यान आणि मार्गावरील इतर शहरांदरम्यान काम, व्यवसाय, शिक्षण व पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्या मोठ्या संख्येतील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. व्यापारी, विद्यार्थी, कर्मचारी यांना नियमित प्रवास व विशेष सहलींसाठी याचा लाभ होणार असून, व्यापार आणि वाणिज्य वाढीसोबतच पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेसचे खास वैशिष्ट्ये –
सुविधा
• वातानुकूलित : सर्व डबे वातानुकूलित प्रणालीने सुसज्ज
• स्वयंचलित तापमान नियंत्रण: डब्यातील गर्दीच्या प्रमाणानुसार तापमान आपोआप समायोजित
• बसण्याची व्यवस्था: लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सोयीस्कर बसण्याची रचना (एर्गोनॉमिक डिझाइन)
• लाइटिंग सिस्टिम : सर्व डब्यांमध्ये एलईडी व सौम्य लाइटिंग
• दरवाजे: सर्व डब्यांमध्ये स्वयंचलित स्लायडिंग दरवाजे
• खिडक्या: निसर्गदृश्य पाहण्यासाठी मोठ्या पॅनोरामिक खिडक्या
• शौचालये: बायो -व्हॅक्यूम तंत्रज्ञानयुक्त स्वच्छ व आधुनिक शौचालये

संरक्षा सुविधा
• आग सुरक्षा: आगीची वेळेवर सूचना व विझवण्याची यंत्रणा
• सीसीटीव्ही निगराणी: संपूर्ण ट्रेनमध्ये कॅमेऱ्याद्वारे सतत देखरेख
• आपत्कालीन संवाद: प्रत्येक डब्यात इंटरकॉम प्रणाली
• ब्रेक प्रणाली: ३०% पर्यंत उर्जा वाचवणारी पुनरुउत्पादन ब्रेक प्रणाली
• ड्युअल सस्पेन्शन प्रणाली: जास्त वेगातही आरामदायक प्रवास सुनिश्चित.

‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा एक भाग म्हणून, ही एक्सप्रेस अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भरतेबाबत देशाच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. या ट्रेनच्या लोकार्पणामुळे महाराष्ट्राची ओळख नवकल्पना आणि संपर्क केंद्र म्हणून अधिक बळकट होईल आणि प्रादेशिक समृद्धीला चालना मिळेल.

वंदे भारत एक्सप्रेस गाड्या आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधांचा कणा म्हणून काम करत, जोडलेल्या भारत सरकारच्या दूरदृष्टीचे हा सोहळा दर्शन घडवतो.

अजनी (नागपूर) – पुणे वंदे भारत एक्सप्रेसच्या नियमित सेवांचे तपशील पुढीलप्रमाणे :

ट्रेन क्रमांक 26102 अजनी–पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही १२.०८.२०२५ पासून (सोमवार वगळता) आठवड्यातील ६ दिवस अजनी स्थानकावरून सकाळी ०९.५० वाजता सुटेल व पुणे येथे त्याच दिवशी रात्री २१.५० वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 26101 पुणे–अजनी वंदे भारत एक्सप्रेस ही ११.०८.२०२५ पासून (मंगळवार वगळता) आठवड्यातील ६ दिवस पुणे स्थानक येथून सकाळी ०६.२५ वाजता सुटेल व अजनी येथे त्याच दिवशी संध्याकाळी १८.२५ वाजता पोहोचेल.

थांबे – वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाईन.

संरचना: एकूण ८ कोच, ज्यामध्ये १ एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि ७ चेअर कार असून, एकूण ५३० प्रवाशांच्या बसण्याची सोय आहे (एक्झिक्युटिव्ह चेअर कार कोचमध्ये ५२ आसने, ५ चेअर कार कोचमध्ये प्रत्येकी ७८ आसने आणि लोको पायलटच्या कोचला जोडलेल्या २ चेअर कार कोचमध्ये प्रत्येकी ४४ आसने).

ट्रेन क्रमांक 26101 व 26102 पुणे- अजनी – पुणे वंदे भारत एक्सप्रेसच्या नियमित सेवेसाठीचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर खुले आहे.