मुंबई :

अजनी (नागपूर) ते पुणे दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. ही ट्रेन महाराष्ट्रातील १२वी वंदे भारत गाडी ठरणार आहे. या ट्रेनमुळे वर्धा ते मनमाड दरम्यानच्या अद्याप सेवा न मिळालेल्या भागाला पहिल्यांदाच वंदे भारत ट्रेनची सेवा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्ट रोजी केएसआर बेंगळूरू रेल्वे स्थानकावरूनअजनी (नागपूर) – पुणे वंदे भारत, बेंगलूरू – बेळगावी वंदे भारत आणि कटडा – अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस या तीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
नागपूर आणि पुणे ही दोन्ही वेगाने विकसित होत असलेली महानगरे असून येथे अनेक लघु व मध्यम उद्योग, शैक्षणिक व वैद्यकीय संस्था, तसेच ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे आहेत. अजनी (नागपूर) ते पुणे दरम्यान वंदे भारत ट्रेन सेवेची सुरूवात या दोन शहरांदरम्यान तसेच मार्गावरील इतर शहरांमध्ये काम, व्यवसाय, शिक्षण आणि पर्यटनानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. ही सेवा व्यावसायिक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग तसेच नियमित प्रवास करणारे आणि विशेष दौर्यावर जाणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या सेवेच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळणार असून व्यापार व उद्योगांसाठी नव्या संधीही निर्माण होणार आहेत.
अजनी (नागपूर) – पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही आतापर्यंतची सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत ट्रेन ठरणार आहे
ही गाडी ८८१ किमी अंतर कापणार आहे. ही महाराष्ट्रातील १२वी वंदे भारत गाडी असून वर्धा–अकोला– शेगाव– भुसावळ– जळगाव– मनमाड आणि पुणतांबा ते दौंड दरम्यानच्या भागात धावणारी पहिली वंदे भारत ट्रेन आहे. नागपूर ते पुणे दरम्यान धावणारी ही सर्वात वेगवान ट्रेन ठरणार असून तिचा सरासरी वेग ७३ किमी प्रतितास असेल आणि ती मार्गामध्ये १० स्थानकांवर थांबेल.
वंदे भारत एक्सप्रेसची नियमित सेवा
ट्रेन क्रमांक २६१०१ पुणे – अजनी वंदे भारत एक्सप्रेस ११ ऑगस्टपासून दर आठवड्यात ६ दिवस (मंगळवार वगळता) पुणे स्टेशनवरून सकाळी ०६.२५ वाजता सुटेल. आणि त्याच दिवशी सायंकाळी ६.२५ वाजता अजनी येथे पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक २६१०२ अजनी – पुणे वंदे भारत एक्सप्रेस १२ ऑगस्टपासून दर आठवड्यात ६ दिवस (सोमवार वगळता) अजनी स्टेशनवरून सकाळी ०९.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ९.५० वाजता पुणे येथे पोहोचेल. ही गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाईन येथे थांबेल.


