जामनेर तालुक्यात सर्पदंश होऊन दोन महिलांचा मृत्यू –

जामनेर : जामनेर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी सर्पदंश होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सयाबाई जगन्नाथ कोळी (वय ६५, रा. नांद्रा हवेली, ता जामनेर) यांना सर्पदंश होऊन त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. कुटुंबातील सदस्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांना तत्काळ जामनेर येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

वैद्यकीय तपासणी करून डॉ. हर्षल चांदा यांनी महिलेस मृत घोषित केले. खबरीनुसार याप्रकरणी फतेपुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार सचिन पाटील हे तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत रत्ना सुधाकर सोनवणे (वय ३०, रा पहूर पेठ, ता जामनेर) यांना सर्पदंश होऊन विषबाधा झाली. त्यांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीत त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. उपनिरीक्षक रवींद्र देशमुख हे तपास करीत आहेत.