भुसावळ विभागात २०२५ चा आंतरराष्ट्रीय योग दिन “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” या थीमसह साजरा ; भुसावळ विभाग आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्यातर्फे भुसावळ येथील पथज्योत रेल्वे क्रीडांगणावर सामूहिक योगाभ्यास ;


भुसावळ विभागात २०२५ चा आंतरराष्ट्रीय योग दिन “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” या थीमसह साजरा केला
भुसावळ विभाग आणि जिल्हाq प्रशासन, जळगाव यांच्यातर्फे भुसावळ येथील पथज्योत रेल्वे क्रीडांगणावर सामूहिक योगाभ्यास

भुसावळ विभागात २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ मोठ्या उत्साहाने साजरा केला. यावर्षी “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” या थीमसह ११वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थितांना संबोधित केले.

या निमित्ताने आयुष मंत्रालय व युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग व जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ येथील पथज्योत रेल्वे क्रीडांगणावर भव्य सामूहिक योग सत्राचे आयोजन करण्यात आले.

या सामूहिक योग सत्रात केंद्रीय युवा व क्रीडा मंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री श्री संजय सावकारे, मंडल रेल्वे प्रबंधक श्रीमती इति पांडे, जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, जिल्हा कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, राज्य सरकारी अधिकारी, भुसावळ शहरातील नागरिक, शाळांचे विद्यार्थी, रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

योग शिक्षिका श्रीमती चंचल माळी, डॉ. आदित्य व डॉ. शरयू यांनी विविध योगासने प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह सादर करत योगाचे आरोग्यदायी फायदे विशद केले. त्यांनी सांगितले की, योग हा केवळ व्यायाम नसून जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. तो तणावमुक्त जीवनासाठी उपयुक्त असून मानसिक संतुलन व आत्मिक शांती साधणारा मार्ग आहे.

या योग सत्रात प्राणायाम, विविध योगासनं आणि ध्यानधारणा यांचा समावेश होता. उपस्थितांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवून कार्यक्रमात एकरूपता साधली. ‘नियमित योगाभ्यास करा, निरोगी आयुष्य जगा’ हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

योग हा केवळ व्यायाम नसून एक जीवनशैली आहे. तो शरीर, मन आणि आत्म्याला संतुलित ठेवतो व मानसिक शांती प्रदान करतो. नियमित योगाभ्यासामुळे तणाव कमी होतो, लवचिकता वाढते, शारीरिक व मानसिक बळकटी मिळते आणि एकाग्रता व सकारात्मकतेत वाढ होते.

भुसावळ विभागातील विविध डेपो व कार्यशाळांमध्येही योग दिन साजरा करण्यात आला. विभागाने सोशल मीडियाच्या माध्यमातून योग व त्याचे लाभ याविषयी जनजागृती व माहिती प्रसारित करत योगदिनीचे महत्व अधोरेखित केले.

भुसावळ विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.