भुसावळ प्रतिनीधी
भुसावळ लिंपस क्लब,संत गाडगेबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अलीकडेच पार पडलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलन (गेट टुगेदर) कार्यक्रमात शालेय प्रांगणात अशोभनीय प्रकार घडल्याची तक्रार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मार्फत करण्यात आली आहे.

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, कार्यक्रम शाळेच्या व्यवस्थापन मंडळ व मुख्याध्यापक यांच्या संमतीने झाला. कार्यक्रमादरम्यान काही माजी विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सार्वजनिक ठिकाणी वाद्यांच्या आवाजात नाचगाण्यांसह एकमेकांवर पैसे उधळल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना शाळेच्या मुख्याध्यापक व काही शिक्षकांच्या उपस्थितीत घडल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे. शिवसेनेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी भुसावळ यांचे कडे तक्रार करण्यात आली आहे .
निवेदनात म्हटले की ,शिवसेनेने हा प्रकार अत्यंत लज्जास्पद व शिक्षण संस्थेच्या मर्यादांना काळीमा फासणारा असल्याचे म्हटले असून,मुख्याध्यापक,संबंधित शिक्षक व शाळेच्या व्यवस्थापन मंडळावर तात्काळ चौकशी करून कडक कारवाई करण्याची तसेच शाळेची सरकारी ग्रँट रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास, शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ,जिल्हा प्रमुख दीपकसिंग राजपूत,विधानसभा संपर्क प्रमुख संजय शोवेकर आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर तालुका प्रमुख निलेश महाजन, माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे, शेख करीद, अरुण साळुंखे, उपशहर प्रमुख करण खरारे, गणेश चौधरी यांची स्वाक्षरी आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सध्या करण्यात येत आहे.


