यावल तालुक्यातील जि.प.चे माजी सदस्य प्रभाकर सोनवणेंसह मातब्बरांचा भाजपात प्रवेश –

यावल – मुंबईत मंगळवारी नाशिकमधील उबाठा गटाच्या पदाधिकार्‍यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर यावल तालुक्यातील काँग्रेसमध्ये काम करणार्‍या अनेक मातब्बर पदाधिकार्‍यांनी भाजपात प्रवेश केल्याने यावल तालुक्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली.

काँग्रेस कमेटीचे तब्बल 29 वर्ष अध्यक्ष असलेले जि.प.चे माजी सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, जि.प.चे माजी सदस्य आर.जी.पाटील, जिल्हा बँक संचालक विनोद पाटील यांच्यासह पश्चिम भागातील असंख्य कार्यकत्यांनी भाजपात प्रवेश केला. या प्रवेशामुळे तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्शभूमीवर हा प्रवेश काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबई येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाकर सोनवणे यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

विशेषतः प्रभाकर आप्पा सोनवणे हे तालुक्यात प्रभावशाली नेतृत्व मानले जात असून त्यांचा भाजप प्रवेश हा तालुक्याच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडवणारा ठरू शकतो. त्यांच्यासोबत अनेक ग्रामपातळीवरील कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्याने भाजपची ताकद वाढणार आहे.

यांनी केला प्रवेश
जिल्हा बँकेचे संचालक विनोद पाटील, जिल्हा परिषदेचेे माजी सदस्य आर.जी.पाटील, शेतकी संघाचे अमोल भिरूड, सरपंच संघटनेचे प्रमुख संदीप सोनवणे, रमजान तडवी, अनिल पाटील, पुंडलिक सावळे, आरती पाटील, मुबारक तडवी, योगेश कोळी, संदीप पाटील, मीनाक्षी पाटील, पाडळसा येथील किरण तायडे, शेखर तायडे, सीताराम कोळीसह लता पाटील, विनोद कोळी, प्रमोद सोनवणे बाळू शिंपी, प्रवीण सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यानी प्रवेश केला.