अपघाताचे सत्र सुरूच ; वरणगावजवळ भीषण अपघात : ट्रक-पिकअप धडकेत चालक ठार, तिघे जखमी –

भुसावळ (प्रतिनिधी ) : शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर वेस्टन हॉटेल समोर मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला तर रिक्षाचालकासह तिघेजण जखमी झाले. ट्रक चालकाविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ट्रक (एम.एच.37 टी.6771) वरील चालक अजहर खान सखाउल्ला खान (रा.समतानगर, कारजा लाड, जि.वाशीम) हा भुसावळकडून वरणगावकडे भरधाव वेगाने जात असताना वेस्टन हॉटेल समोरून निघणार्‍या पिकअप (एम एच-19- सी वाय -4576) ला जोरदार धडकला. या धडकेत पिकअप चालक राजू गुलाब अवतारी (राहणार रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे जागीच ठार झाले.
या ट्रकने पुढे जाऊन रिक्षा (क्रमांक एम.एच.19 सी.डब्ल्यू 2950) ला देखील मागून जोरात धडक दिली .या धडकेत रिक्षा सुमारे 50 मीटर अंतरापर्यंत ओढली गेली. रिक्षा चालकासह त्यामध्ये बसलेले गणेश तळेले व त्यांचा मुलगा ऐश्वर्य गणेश तळेले, मुलगी सारीका गणेश तळेले (20) जखमी झाले. त्यांना तातडीने 108 अ‍ॅम्बुलन्सद्वारे भुसावळ येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले. पिकअपमधील मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. या प्रकरणी रिक्षा चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक अजहर खान सखाउल्ला खान (समतानगर, कारजा लाड, जि.वाशीम) याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक आमित कुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रेमचंद सपकाळे करीत आहे.