सांगली हादरले : धर्म बदलण्यासाठी दबाव ; सात महिन्यांच्या गर्भवती विवाहितेची आत्महत्या –

सांगली – सांगलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव वाढल्यानंतर सात महिन्यांच्या गर्भवती असलेल्या विवाहितेने आपले आयुष्य संपवले आहे. कुपवाड पोलिसांनी नवरा,सासू, सासर्‍याला अटक केली आहे. ऋतुजा सुकुमार राजगे (27) असे मृताचे नाव आहे
सांगली शहरातील यशवंतनगर येथे राहणार्‍या ऋतुजा सुकुमार राजगे (27) एमएस्सी झालेल्या उच्चशिक्षित महिलेने सासरच्या सततच्या होणार्‍या ख्रिश्चन धर्मांतरणाच्या त्रासाला व जाचाला कंटाळून गळफास लावला.

सुकुमार राजगे व ऋतुजा यांचा 2021 मध्ये विवाह झाला होता. या विवाहाच्या वेळी राजगे कुटुंबांनी आम्ही हिंदू धनगर आहोत, असे सांगितले होते. पण विवाहानंतर काही दिवसातच राजगे कुटुंब ख्रिश्चन आहे, हे ऋतुजा व माहेरच्या मंडळींच्या लक्षात आले. तरीही ऋतुजा या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपला संसार करीत होती. पण नवरा सुकुमार राजगे, सासरा सुरेश राजगे व सासू अलका राजगे यांनी ऋतुजा हिला ख्रिश्चन धर्माचा स्वीकार कर, तुझ्या देवांना नमस्कार करणे बंद कर, आमच्याबरोबर चर्चला चल, असं म्हणून तिला त्रास द्यायला सुरुवात केल्याचा आरोप आहे.

ऋतुजाने आपल्या आई-वडिलांना तिला होत असलेल्या या जबरदस्ती धर्मांतरणाबद्दल सांगितले होते, त्यांनी अनेकदा येऊन सासू व सासरे व पती यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. पण सासू अलका राजगे व सासरे सुरेश राजगे हे तिने आपले सर्व हिंदू देव सोडून आमच्या ख्रिश्चन धर्माचे पालन करावे करावे, असा तगादा लावला होता. याच सगळ्या त्रासाला कंटाळून ऋतुजा हिने आपल्या सात महिन्याच्या गरोदरपणात आत्महत्या केली.