बेकायदेशिर पुतळा बसविल्याप्रकरणी गुन्हा दाखल : भुसावळ तालुक्यातील जाडगाव येथील प्रकार ;

वरणगाव । प्रतिनिधी

तालुक्यातील जाडगाव येथे सोमवारी मध्यरात्री बेकायदेशिरपणे श्रीराम मंदिराच्या जागेत राष्ट्रपुरुषाचा पुतळा उभारण्यात आला होता . यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते . याची माहिती मिळताच सपोनि अमितकुमार बागुल यांनी घटनास्थळी धाव घेत शांतता प्रस्थापित करीत काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे .

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भुसावळ तालुक्यातील जाडगाव येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास श्रीराम मंदिराच्या जागेलगत असलेल्या सार्वजनिक मोकळ्या जागेत बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक काढून त्या ठिकाणी बेकायदेशिरपणे राष्ट्रपुरुषाचा पुतळा बसविण्यात आला . याची माहिती गावकऱ्यांना समजताच गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते . तसेच या प्रकरणाची माहिती वरणगांव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल व सहकारी पोलीस बांधवांना मिळताच त्यांनी तातडीने गावात जाऊन तणावपूर्ण शांतता प्रस्थापीत केली . तसेच या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून सखाराम भिका सुरवाडे , निखील शांताराम सुरवाडे ( सरपंच ) व चार ते पाच अनोळखी महिला यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

तसेच गावात शांतता निर्माण रहावी यासाठी काही पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . तर या प्रकरणाचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमितकुमार बागुल , पोहेकॉ श्रावण जवरे, प्रविण पाटील व इतर सहकारी पोलीस बांधव तपास करीत आहेत .