पिंपरी- माहिती अधिकार कायद्याचा काही तथाकथित आरटीआय कार्यकर्ते दुरुपयोग करीत ब्लॅकमेल करीत असल्याचे यापूर्वी आढळून आले आहे.अशाच देहूरोड येथील एका तथाकथित आरटीआय कार्यकर्त्याने तीन तोतया पत्रकारांच्या मदतीने एका बांधकाम व्यावसायिकाला ब्लॅकमेल करीत पन्नास हजार रुपयांची खंडणी उकळली.त्याबाबत देहूरोड पोलिस ठाण्यात या चौघांविरुद्ध काल (ता.८) गुन्हा दाखल होताच देहूरोडच नाही,तर पिंपरी-चिंचवडमध्येही मोठी खळबळ उडाली.

दरम्यान,खंडणीचा गुन्हा दाखल होताच ही चौकडी फरार झाली.त्यामुळे अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे या गुन्ह्याचे तपासाधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शशांक कदम यांनी थोड्या वेळापूर्वी आपला आवाज ला सांगितले.राजू मारीमुत्तू (आरटीआय कार्यकर्ता),चंद्रशेखर पात्रे,रामदास ताठे आणि बाबू टेकल (तिघेही पत्रकार,रा.देहूरोड) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.त्यांच्याविरुद्ध मिंकू सत्येंद्रपालसिंग मल्होत्रा (वय ३४,रा.देहूरोड,ता.हवेली,जि.पुणे)यांनी फिर्याद दिली आहे.त्यांना
कारवाई करून संपवून टाकीन अशी धमकी देत या चौकडीने त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये उकळले.स्कॉर्पिओ मोटारीतून (एमएच-११-वाय-५३७५)येत या चौघांनी मल्होत्रा यांना धमकावले.सेंट्रल चौक,देहूरोड येथील एक हॉटेल आम्ही देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाकडे तक्रार करून जमीनदोस्त केले असून तसेच तुमच्याही जुन्या घराचे सुरु असलेले बांधकाम तसेच पाडू,अशी त्यांनी धमकी दिली.त्यासाठी बांधकामांचे पात्रे,ताठे आणि टेकल यांनी शुटिंग केले.त्याआधारे त्यांनी मल्होत्रांकडून पन्नास हजार रुपये उकळले.ताटे हा स्वतला डॉ.ही म्हणवून घेत आहे.तो व त्याचे दोन साथीदार हे देहूरोडला यू ट्यूब चॅनेल चालवत असल्याचे समजले.पोलिसांनी एफआय़आर मध्ये मारीमुत्तीचा उल्लेख आरटीआय कार्यकर्ता,तर त्याच्या बाकीच्या तीन साथीदारांचा पत्रकार असा केला आहे


