भुसावळ (प्रतिनिधी ) : रेल्वे प्रवाशांना Cqशिस्तबद्ध आणि सुखकर प्रवास अआनुभव मिळावा, यासाठी भुसावळ रेल्वे विभागाने मे महिन्यात तिकीट तपासणी मोहिमांमध्ये विक्रमी कामगिरी केली आहे. या मोहिमांतर्गत विभागाने तब्बल 11 कोटी 19 लाख रूपयांचा महसूल जमा केला, जो तिकीट तपासणी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण विक्रम मानला जात आहे.

रेल्वे स्थानकांवर आणि धावत्या गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश तसेच अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी भुसावळ विभाग सातत्याने तपासणी मोहीम राबवत आहे. मेल, एक्स्प्रेस, हॉलिडे स्पेशल आणि पॅसेंजर गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणी करून प्रवाशांना चांगल्या सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.
डीआरएम इती पांडे यांच्या नेतृत्वाखाली, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) पी. के. सिंह यांच्या देखरेखीखाली ही मोहीम यशस्वीपणे पार पडली.
मे 2025 मध्ये, भुसावळ विभागाने विविध गाड्यांमध्ये केलेल्या सघन तपासणीमुळे बिनतिकीट प्रवास, अनियमित तिकीट आणि प्रवास नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. या कठोर कारवाईच्या उपक्रमामुळे रेल्वेच्या महसुलात मोठी वाढ झाली असून, प्रवाशांमध्येही शिस्तबद्ध प्रवास संस्कृती रुजण्यास मदत झाली आहे. या एकाच महिन्यात एकूण 1 लाख 18 हजार अनधिकृत प्रवास प्रकरणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 48 हजार 367 अनियमित प्रवासाच्या प्रकरणांतून 3 कोटी 13 लाख, 70 हजार 329 बिनतिकीट प्रवासाच्या प्रकरणांतून 8 कोटी 5 लाख आणि 101 जणांनी लगेज बुक न करताच नेत असल्याने सामानाच्या प्रकरणांतून 23 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी विना तिकीट, आरक्षण तिकीट नसतांना आरक्षण डब्यातून प्रवास करू नये, नेहमीच वैध व योग्य तिकीट काढून प्रवास करावा. रेल्वे नियमांचे पालन करून सर्वांनी सहकार्य करावे.


