यावल : शहर व तालुक्यात गुरुवारी दुपारी प्रचंड वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. रिपरीप पाऊस होता मात्र वादळ वारा प्रचंड असल्याने यावल-भुसावळ रस्त्यावर शहराच्या बाहेर भले मोठे वृक्ष चालत्या ट्रॅक्टरवर कोसळले. यात चालक बालं-बाल बचावला ट्रॅक्टरचे मात्र नुकसान झाले. भालोद या गावात वर्दळीच्या रस्त्यावर एक वृक्ष अचानक कोसळून एका घरावर आदळले यामुळे दोन्ही ठिकाणी रहदारीला अडचण निर्माण झाली. काही वेळ वाहतूक ठप्प होती. पाऊस हलका पडला मात्र वादळामुळे अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले आहेत.
शहर व तालुक्यात भालोद, पाडळसा, बामणोद, निमगाव व अंजाळे या शेतशिवारात प्रचंड वादळी वार्यासह पाऊस दाखल झाला होता. गुरुवारी दुपारी दोन वाजता प्रचंड मोठ्या प्रमाणात वादळाने अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले. यात प्रामुख्याने यावल- भुसावळ रस्त्यावर शहराच्या बाहेरच एक भले मोठे वृक्ष चालत्या ट्रॅक्टरवर कोसळले. यात चालक हा बाल बाल बचावला. ट्रॅक्टरवर भले मोठे निंबाचे झाड कोसळल्याने झाडाखाली ट्रॅक्टर दाबले जाऊन ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले. मोठे वृक्ष कोसळल्यामुळे काही वेळ येथील वाहतूक ठप्प झाली होती. त्याचप्रमाणे भालोद या गावात मेन रोडावरच एक वृक्ष कोसळले आणि समोरील घरावर जाऊन धडकले. सुदैवाने यात कोणाचे काही नुकसान झाले नसले तरी रहदारीचा रस्ता मात्र बंद पडला होता.



