जळगाव – शहरातील जुन्या महामाार्गवरील कांताई नेत्रालयाजवळ एका अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने या अपघातात दोघा भावंडांचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर शिवदे व प्रमोद शिवदे अशी मृतांची नावे आहेत.

ज्ञानेश्वर शिवदे हे शिवसेना (शिंदे गट) महिला शहर प्रमुख ज्योती शिवदे यांचे पती असून प्रमोद हे त्यांचे दीर होत. एकाच अपघातात दोघा सख्या भावांचा मृत्यू झाल्याने शिवदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बुधवार, 4 जून रोजी पहाटेच्या सुमारास एक अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिल्यानंतर ज्ञानेश्वर झगडू शिवदे आणि प्रमोद दगडू शिवदे यांचा मृत्यू झाला.
ज्ञानेश्वर आणि प्रमोद शिवदे हे दोघेही बंधू पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत होते. दररोजप्रमाणे पाणीपुरीचा माल तयार करण्यासाठी ते शिवाजीनगर येथील जुन्या घरी जात असताना हा अपघात घडला. अपघातानंतर मयतांचे मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. यावेळी त्यांच्या नातेवाईकांसह शिवसेनेच्या कार्यकत्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली..
दरम्यान, अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे शिवसेना शिंदे गटातीत कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.


