ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे विहिरीत अडकलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका; वनविभाग अधिकारी पोहचण्यास विलंब ; गावकरी नाराज

अंतुर्ली, ता. पाचोरा – (|३ जून))
पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली गावात आज सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. भगवान कोष्टी यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या अडकलेला आढळून आला. विहिरीतील पाणी कमी असल्याने बिबट्याचे प्राण वाचले. तो मुरमाच्या ढिगाऱ्यावर स्थिरावलेला होता.

भगवान कोष्टी हे शेतात गेल्यानंतर त्यांना विहिरीत हालचाल जाणवली. निरीक्षणात बिबट्या दिसल्यावर त्यांनी गावकऱ्यांना बोलावले. ग्रामस्थांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरुवातीला अधिकारी आणि कर्मचारी फोन उचलत नव्हते, असा आरोप स्थानिकांनी केला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत जमाव हटवण्याचे काम केले व वनविभागाच्या पथकास सहकार्य केले.

थोड्या वेळाने वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पिंजऱ्याच्या सहाय्याने बिबट्याला सुखरूप बाहेर काढले व नंतर जंगलात सोडले.

या घटनेमुळे ग्रामीण भागात वन्यजीव मानवी वस्त्यांजवळ येत असल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. वनविभागाच्या प्रतिसादातील विलंब आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.