भुसावळ (प्रतिनिधी ) – दिनांक ०३.०६.२०२५ रोजी मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थान, भुसावळ येथे रेल्वे बोर्डाच्या वतीने अखिल भारतीय स्तरावरील हिंदी नाट्योत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. हे दीपप्रज्वलन क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थानाचे प्राचार्य श्री आर. एन. मीना, रेल्वे बोर्डाच्या राजभाषा निदेशक डॉ. वी. सुगुणा, उप निदेशक (राजभाषा) श्री सतविंदर सिंह, उप महाप्रबंधक (राजभाषा), मध्य रेल्वे डॉ. विभावरी गोरे, पश्चिम रेल्वेच्या उप महाप्रबंधक (राजभाषा) डॉ. रोशनी खूबचंदानी व इतर अधिकाऱ्यांच्या संयुक्त हस्ते करण्यात आले. यानंतर रेल्वे बोर्ड व मुख्यालयातून आलेल्या सर्व मान्यवर अधिकाऱ्यांचे स्वागत प्राचार्य व संस्थेतील इतर अधिकाऱ्यांनी रोपटे भेट देऊन केले.

यानंतर प्राचार्य डॉ. आर. एन. मीना यांनी रेल्वे बोर्ड व मध्य रेल्वे मुख्यालयातून आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे हार्दिक स्वागत करत उद्घाटन भाषणात सांगितले की, नाट्यकला ही आपल्या देशाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि ही कला जिवंत राहावी यासाठी राजभाषा विभाग वेळोवेळी असे कार्यक्रम आयोजित करत असतो, हे अत्यंत प्रशंसनीय आहे. त्यांनी याची माहिती दिली की हा नाट्योत्सव ०३.०६.२०२५ पासून ०६.०६.२०२५ पर्यंत आयोजित केला जाईल आणि समारोपाच्या दिवशी सर्वोत्कृष्ट नाटकाला पारितोषिक देण्यात येईल.
डॉ. आर. एन. मीना यांनी हा भव्य उपक्रम भुसावळ येथे घेण्याची संधी दिल्याबद्दल रेल्वे बोर्डाचे आभार मानले व भारतीय रेल्वेच्या विविध क्षेत्रीय युनिट्समधून आलेल्या सर्व सहभागी कलाकारांना त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी प्रेरणा दिली.

राजभाषा निदेशक डॉ. वी. सुगुणा यांनी या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व आयोजक, अधिकारी, कर्मचारी व सहभागी कलाकारांचे आभार मानले व राजभाषेप्रती त्यांच्या समर्पणाची प्रशंसा केली. मध्य रेल्वेच्या उप महाप्रबंधक (राजभाषा) डॉ. विभावरी गोरे यांनीही सर्व सहभागी कलाकारांचे मनोबल वाढवले व उपस्थित सर्वांचे आभार मानले.
यानंतर कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ झाला. नाट्योत्सवाच्या पहिल्या दिवशी एकूण ०७ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले, जे प्रेक्षकांनी अत्यंत उत्साहाने पाहिले व कौतुक केले. उपस्थित प्रेक्षक या दर्जेदार सादरीकरणांनी अत्यंत प्रभावित झाले.



