भुसावळ प्रतिनिधी (3 जून २०२५ ) – शाळा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची पहिली पायरी असते. शैक्षणिक गुणवत्ता वाढवायची असेल, तर शाळेतील वातावरण आनंददायी, प्रेरणादायक आणि सुरक्षित असणे अत्यंत आवश्यक आहे. जेथे नेतृत्व सक्षम आहे, शिक्षक प्रेमाने शिकवतात, विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संवाद साधतात, तिथे शिकण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होते. याच आनंददायी शैक्षणिक वातावरणामुळे शालेय गुणवत्तेत वाढ होत असल्याचे प्रतिपादन बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले.

भुसावळ येथील सार्वजनिक वाचनालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष हिम्मत उर्फ मुन्ना ठाकूर, भुसावळ गटसाधन केंद्राचे विषयतज्ज्ञ संजय गायकवाड, के. नारखेडे विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन किरंगे व सौ. सायली किरंगे उपस्थित होते. मुख्याध्यापक नितीन तिरंगे यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सन्मानपत्राचे वाचन डॉ. जगदीश पाटील यांनी केले. संजय गायकवाड यांनी त्यांच्या शिक्षकी कार्याचा गौरव केला. ग्रंथपाल नितीन तोडकर यांनी वाचनाचे महत्त्व सांगितले. शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही नितीन किरंगे सरांनी केलेल्या कार्याचा गौरव सहाय्यक ग्रंथपाल अवधूत दामोदरे यांनी केला. अध्यक्षीय मनोगतात हिम्मत उर्फ मुन्ना ठाकूर यांनी एकाच फॅक्टरीतून अनेक क्षेत्रातील मान्यवर त्यांनी तयार केल्याचे सांगितले. सत्कारार्थी मनोगतात मुख्याध्यापक नितीन किरंगे म्हणाले की, शिक्षणक्षेत्रात काम केल्याचा खरा आनंद मिळाला. पुस्तके आणि पुस्तकांसोबत भेटलेली मित्र यांच्यामुळे अधिकाधिक समृद्ध झालो असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी संजय चौधरी, नाना पाटील, हरिश पाटील, होनाजी चौधरी यांच्यासह वाचक उपस्थित होते. सूत्रसंचालन अवधूत दामोदरे यांनी यांनी केले.
शालेय गुणवत्तेची खरी गुरूकिल्ली –
शाळेतील शिस्त, स्वच्छता, समतेची भावना, आणि प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळणे हे आनंददायी वातावरण घडवण्यासाठी महत्त्वाचे ठरते. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यात सकारात्मक नाते असेल, तर संपूर्ण शिक्षणप्रक्रिया अधिक परिणामकारक होते. अशा वातावरणामुळे विद्यार्थी केवळ गुणांनी नव्हे, तर संस्कारांनीही समृद्ध होतात. त्यामुळे आनंददायी शैक्षणिक वातावरण ही शालेय गुणवत्तेची खरी गुरुकिल्ली ठरते, असेही डॉ. जगदीश पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
फोटो ओळी –
मुख्याध्यापक नितीन किरंगे यांचा सन्मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करताना हिम्मत उर्फ मुन्ना ठाकूर, डॉ. जगदीश पाटील, संजय गायकवाड, नितीन तोडकर, अवधूत दामोदरे आदी


