पारोळा
येथील साई नगरातील रहिवाशी क्षत्रिय माळी समाजाचे पंच तथा पत्रकार विशाल महाजन यांनी आपल्या लग्न सोहळ्यात हरित शपथ घेत प्लास्टिक मुक्तीचा संकल्प करीत लग्नगाठ बांधण्यापूर्वी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. त्यांच्या या पर्यावरण पोषक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शहरातील साई नगरातील रहिवाशी कै. नाना पंडित महाजन यांचे कनिष्ठ चिरंजीव तसेच मनन संस्थेचे उपाध्यक्ष राहुल महाजन, विशाल एजन्सी’चे संचालक अमोल महाजन यांचे लहान बंधू क्षत्रिय माळी समाजाचे पंच तथा पत्रकार विशाल (एम.ए. पी.एचडी) आणि चोपडा तालुक्यातील अडावद येथील सुपडू सीताराम महाजन यांची ज्येष्ठ कन्या ममता ( बीएस्सी बीएड) यांचा शुभमंगल सोहळा नुकताच पार पडला. त्यात त्यांनी लग्नगाठ बांधण्यापूर्वी वृक्षारोपणासह हरित शपथ घेतली. त्यामुळे पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. तसेच मंगल कार्यलयाच्या दर्शनी भागात ठिकठिकाणी पर्यावरण बाबत जनजागृती करणारे फलक लावण्यात आले होते. त्यामुळे व्यापक स्वरूपात पर्यावरण बाबत जनजागृती झाली. या उपक्रमात मुख्याधिकारी तथा प्रशासक किशोर चव्हाण, प्रशासकीय अधिकारी तथा कार्यालय अधीक्षक यामिनी लक्ष्मणसा जटे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी तथा नौडल अधिकारी चंद्रकांत महाजन, शहर समन्वयक माझी वसुंधरा अभियान अक्षय सोनवणे, शहर समन्वयक स्वच्छ भारत अभियान शुभम कंखरे, क्षेत्रिय समन्वयक राहुल प्रजापती यांचे सहकार्य लाभले.
वऱ्हाडीना मिळाली विचारांची मेजवानी …..
विवाह सोहळ्याच्या निमित्ताने महाजन परिवाराने वाचन संस्कृती वाढविण्यासाठी मंगल कार्यालय समोर पुस्तक प्रदर्शन सुद्धा लावले. यावेळी लग्नासाठी आलेल्या पाहुणे मंडळीं, वऱ्हाडीनी नानाविध पुस्तके खरेदी केली. लग्नाच्या निमित्ताने समाज जागरणासाठी केलेल्या उपक्रमामुळे विशाल महाजन यांच्या यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिवाय आपल्या लग्न पत्रिकेतून झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा, स्री-भृण हत्या टाळण्यासाठी मुलगा-मुलगी समानतेचा संदेश दिला.
यावेळी माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, चंद्रकांत पाटील, सुरेंद्र बोहरा, माजी उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, माजी नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती अंजली पवार, माजी नगरसवेक डी. बी. पाटील, धीरज महाजन, भैय्या चौधरी, मनोज जगदाळे, भावडू राजपूत यांच्यासह प्रशासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दिली तर खासदार स्मिता वाघ हे दिल्लीला असल्याने त्यांनी दूरध्वनीद्वारे वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.


