“एक भारत – श्रेष्ठ भारत”च्या घोषणांनी सुरू झाली सिंधू दर्शन यात्रा

पवित्र नद्यांच्या काठावर आयोजित होणारे मेळे आणि महोत्सव हे केवळ आपल्यातील स्नेह-संबंध वाढवणारे नसून, ते आपल्या सामाजिक आणि राष्ट्रीय एकतेलाही बळकटी देणारे असतात, असे प्रतिपादन सनातन धर्म सभा, जम्मू-काश्मीरचे प्रांतीय अध्यक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जम्मू-काश्मीर प्रांताचे माजी प्रांत कार्यवाह श्री पुरुषोत्तम दधीचि यांनी “भारतीय सिंधू सभा” द्वारा आयोजित सिंधू दर्शन यात्रा 2025 च्या उद्घाटनप्रसंगी केले.
जम्मू येथील गुम्मट चौकातून यात्रेकरूंना रवाना करण्यापूर्वी त्यांनी विधिवत पूजन-अर्चन केले व नारळ फोडून यात्रेकरूंना व आयोजकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, “आपण सर्वजण अत्यंत भाग्यवान आहात की या पवित्र यात्रेत सहभागी होता आहात.”
या प्रसंगी “भारतीय सिंधू सभा”चे राष्ट्रीय कार्यवाहक अध्यक्ष राजेश वाधवानी म्हणाले की, “ही यात्रा राष्ट्रीय गौरव आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. ज्या पवित्र उद्देशाने तिची सुरुवात झाली, त्या उद्दिष्टांची पूर्तता ही यात्रा दरवर्षी यशस्वीरित्या करत आहे.”
यात्रेच्या प्रारंभावेळी यात्रेकरूंनी “एक भारत – श्रेष्ठ भारत” आणि “भारत माता की जय” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमवून टाकले.
ही यात्रा १२ जून रोजी संपन्न होणार असून, त्याआधी ६ जून रोजी लेह-लडाख येथील पवित्र सिंधू काठावर मुख्य आयोजन होणार आहे.
या दरम्यान “भारतीय सिंधू सभा”चे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकेश लखवानी, सिंधू दर्शन यात्रा विभागाचे राष्ट्रीय संयोजक सुरेंद्र लछवानी, भारतीय सिंधू सभा मध्यप्रदेश युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष मनोज पंजवानी, महाराष्ट्र प्रदेश मंत्री दिनेश दोदानी, कांती पटेल, नमोश तलरेजा, कैलाश खत्री, राजू बालानी, मूलचंद बसंतानी आणि कमलेश सचदेव प्रमुख उपस्थित होते.



