चंद्रकांत बढे सरांना मारहाण – गुन्हा दाखल, एकास अटक; नागेश्वर मंदिर संस्थेच्या जागेचा वाद आला चव्हाट्यावर

वरणगांव । प्रतिनिधी

वरणगाव ते बोदवड मार्गावरील श्री नागेश्वर महादेव मंदिर संस्थेची जागा अध्यक्ष चंद्रकांत बढे सर यांनी एका फायर इन्स्टिट्यूट संस्थेला भाडेतत्वार दिली आहे . मात्र,या जागेचा भाडे तत्वाचा वाद सुरू असतांनाच भाडेकरूने बळजबरीने कंपाऊड करण्यास सुरुवात केली होती . याबाबत बढे सर यांनी मज्जाव केला असता वाद विकोपाला जावून भाडेकरूचे पती दिपक वानखेडे व त्यांचा सहकारी जितेंद्र माळी यांनी बढे सरांना धक्का – बुक्की करीत मारहाण केली होती याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली .

याबाबत सविस्तर माहिती अशी की वरणगाव ते बोदवड मार्गावर असलेल्या पुरातन श्री नागेश्वर महादेव मंदिर संस्था असुन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत हरी बढे सर यांनी संस्थेच्या इमारती मधील काही जागा ‘ इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ फायर ॲन्ड सेफ्टी इंजिनीअरींग या संस्थेच्या अध्यक्षा सविता वानखेडे यांना भाडे तत्त्वावर दिली आहे .मात्र, मागील काही महिन्यांपासून या जागेच्या भाडे करारावरून संबंधीतांमध्ये वाद सुरू असतानांच फायर इन्स्टिट्युट संस्थेच्या अध्यक्षाचे पती दिपक बळीराम वानखेडे ( रा .आयुध निर्माणी वरणगाव ) व त्यांचा सहकारी जितेंद्र गणेश माळी यांनी सदरहु जागेला संरक्षण जाळी कुंपन करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती चंद्रकांत बढे सर यांना मिळाली . त्यानुसार ते संस्थेचे सदस्य गोविंदा नामदेव माळी यांनी त्या ठिकाणी जावून काम करण्यास मज्जाव केला असता यावेळी वादावादी निर्माण होवून दिपक वानखेडे व त्यांचा सहकारी जितेंद्र माळी यांनी वय वर्ष ८० असलेल्या बढे सर व त्यांचे सहकारी सदस्य यांना धक्का बुक्की करीत मारहाण केली . यावेळी बढे सर यांच्या बोटातील दहा ग्रॅम सोन्याची अंगठी गहाळ झाली असुन या प्रकरणी चंद्रकांत बढे सर यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात दोन महिन्यानंतर वरील दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांपैकी दिपक वानखेडे यास अटक करण्यात आली आहे . तर वानखेडे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली .

जातीय वादाचा गुन्हा दाखल

नेहमी सर्व जाती धर्माच्या नागरीकांच्या सुखः दुखःत सहभागी होऊन त्यांना दिलासा देणारे चंद्रकांत हरी बढे सर यांच्याशी श्री नागेश्वर महादेव मंदिर संस्थेच्या भाडे कराराच्या जागेमुळे वाद निर्माण झाला आहे . या प्रकरणी २८ फेब्रुवारी रोजी श्री बढेसर यांना भाडेकरू महिलेच्या पतीने व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली होती . या प्रकरणी त्यावेळी काही लोकांच्या मध्यस्थीनंतर तसेच मुक्का मार लागल्याने सरांवर खासगी उपचार सुरू होते . यामुळे गुन्हा दाखल करण्याचे टाळले होते . मात्र, यानंतर आयुध निर्माणीत कार्यरत असलेल्या भाडेकरूचे पती दिपक वानखेडे यांनी ९ मे रोजी पोलीस ठाण्यात बढे सर व त्यांच्या सहकारी विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे . यामुळे खळबळ उडाल्याने संविधान आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे व इतर सामाजिक संघटनांनी पोलीस विभागातील वरीष्ठ अधिकारी तसेच गृह विभागाकडे निवेदनाद्वारे बढे सर यांच्यावर दाखल करण्यात आलेला जातीयवादाचा खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे . यामुळे या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे .