दीपनगरात 20 लाखांची खंडणी मागणार्‍या युट्यूबच्या पत्रकाराविरोधात गुन्हा –

भुसावळ (प्रतिनिधी ) : बिल्डिंग बांधकामाचे फोटो व व्हिडीओ शुटींग व्हायरल करण्याची तसेच स्थानिक न्युज चॅनल यांच्याकडे फोटो व व्हिडीओ शुटींग देवून कंपनीची बदनामी थांबवण्याची धमकी देत 20 लाखांची खंडणी मागणार्‍या सोशल मिडीयातील युट्यूब पत्रकाराविरोधात भुसावळ तालुका पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने पत्रकार वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. योगेश तळेले (फेकरी, ता.भुसावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे.

मोहन रामदास भावसार (58, रा.ब्लॉक नं. बी 6, अमेय अपार्टमेंट, यावल रोड, तापीनगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार 5 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 11.30 वाजता ते 13 मार्च 2025र दरम्यान फिर्यादीस व फिर्यादीच्या मोबाईल फोनवर औष्णिक विद्युत प्रकल्पात बिल्डिंग बांधकामाचे फोटो व व्हिडीओ शुटींग व्हायरल करण्याची तसेच स्थानिक न्युज चॅनल यांच्याकडेस फोटो व व्हिडीओ शुटींग देवून कंपनीची बदनामीच्या मोबदल्यात 20 लाख रुपयांची खंडणी तक्रारदारासह त्यांचा सहकारी तसलीम अकबर पटेल (भुसावळ) यांच्याकडे मागण्यात आली.

कॉल रेकॉडींग असलेला पेन ड्राईव्ह जप्त
त्रास असह्य झाल्यानंतर तक्रारदाराने भुसावळ तालुका पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्याशी सोमवारी सायंकाळी चर्चा केल्यानंतर रात्री उशिरा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी योगेश तळेलेंसोबत झालेल्या संभाषणाची कॉल रेकॉडींग असलेला पेन ड्राईव्ह तपासार्थ ताब्यात घेतला आहे. तपास सहाय्यक फौजदार युनूस शेख करीत आहेत.