भुसावळात विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणार्‍या मान्यवरांचा भारतीय संविधान भेट देवून सन्मान:

भुसावळ (प्रतिनिधी ) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त शिवदत्त नगरातील बुद्धिष्ट सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सर्व समाजातील विविध क्षेत्रातील सामाजिक व विविधांगी कार्य करणार्‍या व्यक्तींचा भारतीय संविधान भेट देऊन सन्मान करण्यात आला.

अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी होते. यावेळी भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, प्रभागाचे माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांच्याहस्ते सर्व मान्यवरांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या भाजपचे अनुसुचित जाती मोर्चा भुसावळ शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे यांचहीा सन्मान करण्यात आला.

संस्थाध्यक्ष बी.वाय.सोनवणे यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन गजानन इंगळे यांनी केले. यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष भगवान बागुल, सचिव राजीव कापडणे तसेच सर्व सह पदाधिकारी सदस्य यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात सर्व प्रमुख पाहुण्यांसह एकूण 35 सन्मानार्थीना भारतीय संविधान भेट देऊन प्रत्येक भारतीयांच्या घराघरात संविधान प्रत पोहचवण्याचा एक सुंदर उपक्रम संस्थेने राबविल्याचे युवराज लोणारी यांनी सांगितले.