महामानवाच्या जयंतीनिमित्त भुसावळ शहर झाले ‘निळेमय’ : 33 मिरवणुका सहभागी होणार ; भुसावळ बसस्थानकाचे दोन दिवस आगारात स्थलांतर :

भुसावळ (प्रतिनिधी ) : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भुसावळ शहर सजले आहे. जयंती उत्सव समितीतर्फे शहरातील विविध भागात रोशनाई तसेच बॅनर लावण्यात आले असून जयंतनिमित्त सोमवारी दिवसभरात शहरातील विविध भागातून 33 मिरवणुका निघणार आहेत. या मिरवणुकांमध्ये सजीव देखाव्यांचे सादरीकरणही केले जाणार आहे. महामानवाच्या पुतळ्यासाठी होणारी अभिवादनासाठीची गर्दी लक्षात घेता रविवारी सकाळीच भुसावळ बसस्थानकाचे आगारात स्थलांतर करण्यात आले असून सोमवारीदेखील आगारातून बसेस प्रवाशांची ने-आण करतील.

भुसावळ शहर झाले निळेमय
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण शहरात निळे ध्वज लावण्यात आले आहेत तसेच ठिकठिकाणी डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमा असलेल्या बॅनर्स लावण्यात आले आहेत. मुख्य मार्गासह अन्य भागात सुध्दा निळे झेंडे, बॅनर्स लावून मोठ्या प्रमाणावर रोशनाई करण्यात आली असून या रोशनाईने शहर उजळले आहे. डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसर सुशोभित करण्यात आला आहे. जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण आहे.

शहरातून निघणार 33 मिरवणुका
सोमवारी शहरातील विविध भागातून डॉ.आंबेडकरांची प्रतिमा चित्ररथावर ठेऊन व जिवंत देखावे यासह शोभायात्रा निघणार आहे. शहरातील विविध भागातून 33 मिरवणुका निघणार आहे. यात शहर हद्दीतून 20, बाजारपेठ हद्दीतून 13 अश्या एकूण 33 मिरवणुकांचे नियोजन करण्यात आले आहे.

पुतळ्याचा परिसर सुशोभित
पालिकेच्या जुन्या इमारतीसमोर असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उत्सव समितीतर्फे सुशोभित करण्यात आला तर डॉ.आंबेडकर यांच्या पुतळा असलेल्या स्मारकाला रंगरंगोटी करण्यात आली. 40 फुटांचा देखवा तयार करण्यात आला असून संसद भवनाची प्रतिकृती तयार करून संविधान बनवण्यात आले आहे. उत्सव समितीचे अध्यक्ष बाळा पवार व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली देखावा तयार करण्यात आला आहे.