बार्शी – सर्वसामान्यांकडे चोर्या, घरफोड्या नवीन नाहीत मात्र बार्शीतील माळेगावात पोलिसाच्याच घरात चोरट्यांनी चोरी करीत यंत्रणेला आव्हान दिल्याने या चोरीची सर्वदूर चर्चा आहे. शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास मळेगाव (ता. बार्शी) येथे हा प्रकार घडला.

संताजी अलाट हे पोलीस सेवेत असून मळेगावात ते राहतात. संताजी अलाट यांच्या आई भागिरथी मधुकर अलाट यांनी पांगरी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला.
फिर्याद दाखल होताच सकाळी पोलिस ताफ्यासह ठसे तज्ज्ञ, श्वानपथकास पाचारण करण्यात आले. श्वान घरापासून पाचशे मीटर अंतरावर जाऊन घुटमळत राहिले. फिर्यादीत म्हटले आहे की, मळेगाव येथील घरी रात्रीच्या नऊ वाजता फिर्यादीसह सर्वजण जेवण आटोपून झोपले होते.
फिर्यादीची दोन्ही मुले सरकारी नोकरी करत असून त्यातील संताजी हे वैराग पोलिस ठाण्यात पोलिस सेवेत आहेत. ते रात्री पावणेबारा वाजता घरी येऊन झोपले होते. पहाटेच्या सुमारास शेजारचे अमोल जामदार याने आवाज देऊन तुमच्या घराशेजारील घरांना बाहेरून कड्या घातल्या आहेत. तुमच्या किचनच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटलेला दिसत आहे. सारे जागी झाल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. कपाट उघडून पाहिले असता 21 तोळे सोन्याचे दागिने, 8 चांदीची भांडी, पाच हजार रुपये रोकड, यासह पोलिस गणवेश, कागदपत्रे असा आठ लाख 68 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला.
घटनेची माहिती मिळताच एपीआय हेमंतकुमार काटकर, हवालदार सचिन माने, शब्बीर शेख, तानाजी लोकरे, अभिजित जगदाळे, संगम वडले, ईश्वर कांदे, कृष्णा नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून तपासासाठी दोन पथके रवाना करण्यात आली.


