मुंबई –
मध्य रेल्वेने कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी पार्सल रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.
गोधनी (नागपूर) ते न्यू तिनसुकिया पार्सल रेल्वे गाडी ४१ टन फळे, लसूण आणि आले इत्यादींसह देशाच्या पूर्वेकडील भागांसाठी आवश्यक वस्तू पुरवठा साखळी कायम ठेवण्यासाठी सोडण्यात आली.
कल्याण ते सांकराईल (कोलकाता) पार्सल गाडी दिनांक २ एप्रिल रोजी औषध आणि वैद्यकीय साहित्य, मास्क, सॅनिटायझर यांसह सोडण्यात आली. नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बडनेरा, नागपूर, दुर्ग, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, टाटानगर येथे ही गाडी थांबणार असल्याने अधिक पार्सलची वाहतूक यातून होणे अपेक्षित आहे.
दिनांक ९ एप्रिल रोजी होणा-या आणखी एका प्रवासासाठी मुंबई भागातील पार्सल लोडर्स आणि ई-कॉमर्स कंपन्या या पार्सल ट्रेनचा लाभ घेऊ शकतात.
दुसरी पार्सल ट्रेन कल्याण येथून दिनांक ७ एप्रिल रोजी चांगसारी (गुवाहाटी) साठी सुटेल.
००१०३ पार्सल रेल्वे गाडी कल्याण येथून दिनांक ७ एप्रिल रोजी ८.३० वाजता सुटेल व चांगसारी येथे दि. १० एप्रिल रोजी १२ वाजता पोहोचेल. ००१०४ पार्सल रेल्वे गाडी १० एप्रिल रोजी ११.३० वाजता चांगसारी येथून सुटेल आणि कल्याण येथे दि. १३ एप्रिल रोजी ८ वाजता पोहोचेल.
थांबे : इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बडनेरा, नागपूर, दुर्ग, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, टाटानगर, सांकराईल, भट्टानगर, डानकुनि, मालदा टाऊन, न्यू बोंगाईगाव.
पार्सल ट्रेनचे नियोजन:
पार्सल ट्रेन कल्याण येथून सकाळी ९ वाजता सुटेल आणि हजरत निजामुद्दीन येथे दुसर्या दिवशी ३.४० वाजता पोहोचेल. परत येताना हजरत निजामुद्दीन येथून १२.३० वाजता सुटेल व दुसर्या दिवशी सकाळी ७.१० वाजता कल्याण येथे पोहोचेल.
दरम्यान गाडिला थांबे इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ. पक्षकारांनी (पार्टी) मागणी केल्यास अधिक थांबे प्रदान करण्यात येतील.
जर संपूर्ण पार्सल ट्रेन एखाद्या पार्टीद्वारे सुरूवातीच्या ठिकाणी लोड केली गेली तर गंतव्यस्थानावर त्वरीत पार्सल ट्रेन पोहोचू शकते. कोणत्याही गंतव्यस्थानासाठी पार्टीकडून पूर्ण पार्सल ट्रेनची मागणी आल्यास, मध्य रेल्वे सेवा प्रदान करण्यासाठी तत्परतेने कार्य करेल. या सेवा १४ एप्रिल २०२० रोजी सुरू होणार्या प्रवासापर्यंत वैध आहेत. ज्यांना जीवनावश्यक वस्तू पाठवायच्या आहेत त्यांना या संधीचा उपयोग घेता येईल.
असे ३ एप्रिल २०२० रोजी मध्य रेल्वे, जनसंपर्क विभाग यांचेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून प्रसिद्ध करण्यात आले आहे.



