कंडारी परिसरात बिबट्याचा वावर ; वन विभाग सतर्क

भुसावळ प्रतिनिधी ;- शहरालगतच्या कंडारी परिसरातील केंद्रीय विद्यालयाच्या मागील बंद खोल्यांमध्ये बिबट्याने गाढवाचा फडशा पाडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी येऊन त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

रविवारी सायंकाळी केंद्रीय विद्यालयाजवळ बिबट्या आढळल्याची चर्चा परिसरात पसरली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी गाढवाचा मृतदेह सापडल्याने हा हल्ला बिबट्यानेच केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बिबट्याचा वावर?

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तपासणी केली असता बिबट्याच्या स्पष्ट पायाचे ठसे आढळले नाहीत. मात्र, प्राण्याची शिकारी करण्याची पद्धत बिबट्यासारखीच असल्याने हल्ला बिबट्यानेच केला असावा, असा संशय आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

या घटनेनंतर कंडारी आणि सुभाष नगर परिसरात भीतीचे वातावरण असून, नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, आपल्या जनावरांचे संरक्षण करावे, असे आवाहन पोलिस पाटील रामा तायडे यांनी केले आहे.

रेल्वे क्वार्टर, ऑर्डनन्स फॅक्टरी आणि कंडारी परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी सावध राहावे आणि वन विभागाने लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.